भांडवली बाजाराने बुधवारी पुन्हा तेजीचा मार्ग अवलंबिला. १५१.१५ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक २८,२२३.०८ वर पोहोचला. तर ५१.०५ अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,५६७.९५ वर बंद झाला. सेन्सेक्स आता गेल्या पंधरवडय़ाच्या उच्चांकासमीप आहे.
सलग दोन महिने घसरण नोंदविल्यानंतर जुलैमधील सेवा क्षेत्राने वाढ नोंदविल्याचे बाजारात बुधवारच्या सत्रात स्वागत झाले. त्याचबरोबर भारती एअरटेल, ब्रिटानियासारख्या निवडक कंपन्यांनी तिमाही नफ्यातील वाढ नोंदविल्याची दखलही बाजाराने घेतली.
गेल्या सलग चार व्यवहारांत सेन्सेक्सने ७२७.८३ अंश घसरण नोंदविली आहे. डॉलर अधिक भक्कम होत असल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांनीही बुधवारच्या सत्रात तेजीची कामगिरी बजाविली. अमेरिकी चलन गेल्या चार महिन्यांच्या उच्चांकावर प्रवास करत आहे.
सेन्सेक्समध्ये मूल्यवाढ झालेल्या अन्य समभागांमध्ये बजाज ऑटो, टाटा स्टील, ल्युपिन, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, हीरो मोटोकॉर्प आदींचा समावेश राहिला. तर अदानी एन्टरप्राईजेस, नेस्लेच्या समभागांनीही उल्लेखनीय कामगिरी बजाविली.