भांडवली बाजाराची नवी सप्ताह चाल सोमवारी तेजीसहच राहिली. मात्र मुंबई निर्देशांक २१ हजारापासून लांबच राहिला. अवघ्या ११ अंशांची भर सेन्सेक्स गेल्या तीन वर्षांच्या नव्या नीचांकावर पोहोचला. निफ्टीत तुलनेत अधिक, १५.६० अंशांची वाढ झाल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक ६,२०४.९५ पर्यंत पोहोचला.
शेअर बाजाराची गेल्या सप्ताहातील कामगिरी चांगली राहिली होती. शुक्रवारच्या एकाच व्यवहारात तर त्याची झेप ४६७.३८ अंश होती. असे असताना मुंबई निर्देशांक २१ हजारापासून अवघ्या १०० अंश लांबच होता. नव्या सप्ताहाची सुरुवात करताना सोमवारच्या सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स अर्धशतकी वाढीसह तेजीसहच खुला झाला. भांडवली वस्तू कंपन्यांच्या समभागांना बाजारात मागणी राहिली.
विशेषत: लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोसारख्या समभागांचे मूल्य वधारले. कंपनीने आगामी कालावधीतही महसुली उद्दिष्ट कायम ठेवले आहे. कंपनीचा समभाग ६ टक्क्य़ांपर्यंत उंचावला. या जोरावर सेन्सेक्सचा दिवसभराचा प्रवास २०,९७०.९२ ते २०,७६८.९९ असा राहिला. अगदी २१ हजाराच्या उंबरठय़ावर पोहोचूनही मुंबई निर्देशांकाने या अनोख्या पातळीला दिवसअखेपर्यंतही स्पर्श केलाच नाही.