योग छान जुळून यावा, असे शेअर बाजाराच्या बाबतीत क्वचितच घडते. चिंतेचे जे काही विषय भांडवली बाजारकर्त्यांच्या मनमतिष्कावर स्वार होते, त्यांचे निवारण गेल्या आठवडय़ात एक-एक करीत होताना दिसले. देशांतर्गत संसदेतील गदारोळ शमून मतदानाने का होईना संसद चालू देण्याबाबत सहमती अखेर घडून आली. देशाच्या डळमळलेल्या अर्थव्यवस्थेबाबत भरवसा दाखविणारे शेरे एक नव्हे तर मूडी आणि गोल्डमन सॅक्स या दोन जागतिक मानांकन संस्थांकडून आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम ग्रीसला आर्थिक मदतीचे सोपस्कार मार्गी लागले, तर दुसरीकडे अमेरिकेच्या संदर्भात चिंतेच्या बनलेल्या वित्तीय आघाडीवरील कठोर उपायांबाबत बराक ओबामा प्रशासनाची नरमाई पहिल्यांदाच दिसून आली. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये डिसेंबरच्या ‘सँटा रॅली’च्या मुहूर्ताला मग आपल्या शेअर बाजारांनी तेजी दाखवून नमन केले नसते तरच नवल ठरले असते. बुधवारी शेअर बाजारासाठी सुट्टीचा वार होता. पण मंगळवारी ३०५ अंशांची तर गुरुवारी ३२६ अंशांची अशा सेन्सेक्सच्या सलग दोन ट्रिपल सेंच्युरीज् दिसण्याचा प्रसंग आपल्या बाजारांनी गेल्या दोन-अडीच क्वचितच अनुभवला असेल. म्हणूनच आता निर्देशांकांच्या नवीन उच्चांकांबाबत मोठय़ा आशेने बाजारात बोलले जात आहे. दोन आठवडय़ापूर्वी अशा काही शक्यतेबाबत कुणी पुटपुटले जरी असते तरी त्याला वेडय़ात काढले गेले असते. बाजाराचा मूड असाच क्षणाक्षणाला वळणे घेणारा असतो.
विदेशी वित्तसंस्थांची जोवर जोमाने खरेदी सुरू आहे, तोवर या बाजारात सर्व शक्यतांना सारखाच वाव आहे. पण त्यातून बाजार अशा एका वळणावर येऊन ठेपला आहे की, देशी संस्था आणि सामान्य गुंतवणूकदारांच्याही बाजारात आता अपरिहार्यपणे उडय़ा पडतील. तेही अशा वेळी जेव्हा अमेरिका-युरोपात वर्षसांगतेच्या सुट्टय़ांमुळे बाजारातील विदेशी दाता हात जेव्हा गायब होऊ घातला आहे. गुरुवारी फ्युचर्स आणि ऑप्शन्स या वायदा व्यवहाराच्या सकारात्मक सौदापूर्तीने याचे दृढ संकेत दिले आहेत. नव्या डिसेंबर मालिकेसाठी सुरुवातच निफ्टीसाठी ६००० च्या कॉलवर झाली आहे. त्याचवेळी प्राथमिक बाजारपेठेत बऱ्याच कालावधीनंतर सुरू झालेली चलबिचल, बाजारात पुढच्या दोनेक आठवडय़ात तरी दगाफटका होणार नाही याकडे खूण करणारी आहे. भारती इन्फ्राटेल या अलीकडच्या काळात सर्वात मोठय़ा भागविक्रीला येत्या १० डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. केंद्र सरकारकडून रु. ३०,००० कोटींचे निर्गुतवणुकीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकारी कंपन्यांतील हिस्सा विक्रीसाठी होणारी भागविक्री डिसेंबरमध्येच बहुतांश होईल. त्याचप्रमाणे तांत्रिकदृष्टय़ाही निफ्टीने महत्त्वाचे टप्पे गाठले असल्याने एकूण कल सकारात्मकच दिसतो.
एचडीएफसीवर विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची मेहेरनजर भावातील चढत्या भाजणीतून दिसून येते. औषधी कंपन्यांचे शेअर्सही सतत वाढत आहेत. स्ट्राइड अर्कोलॅब, इप्का, ग्लेनमार्क फार्मा, बायोकॉन सारखे वाढत आहेत. बायर कॉर्प, कोलगेट, आयशर मोटर्स, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, मॅकलॉइड रसेल, मदरसन सुमी, येस बँक, युनायटेड स्पिरिट्स यांनी तर नवनवीन उच्चांकाकडे या आधीच कूच केली आहे.
किराणा व्यापारात विदेशी गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढीसह संसदेच्या हिवाळी अधिवेशनात, महत्त्वपूर्ण विमा, पेन्शन, बँकिंग सुधारणा कायद्याला मंजुरीची प्रतीक्षा आहे. पण गुरुवारचा बाजारातील उत्साह, एफ अ‍ॅण्ड ओमध्ये दमदार रोलओव्हर आणि रेकॉर्ड ब्रेक उलाढालीचे आकडे याबाबत केंद्र सरकारपुढे कोणताचा अडसर नसल्याचे निदेशक मानावेत इतके तगडे आहेत. डिसेंबरच्या पहिल्या दिवसापर्यंत ११ महिन्यात सेन्सेक्सने जवळपास २४ टक्के वाढ दाखविली आहे, तर बीएसई मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांकांचा परतावा त्यापेक्षा खूपच सरस म्हणजे अनुक्रमे ३१.३७% आणि २९.२८% असा राहिला आहे. हा प्रवाह यापुढे असाच चालू राहिल असे दिसून येत नाही. त्यामुळे अशा कोणत्या समभागांमध्ये विक्री सुरू करून फायदा पदरात पाडून घ्यावा. पण हे सुचवीत असताना आगामी तेजीचा कल पाहता, अल्पकालीन खरेदीसाठी पुन्हा मिडकॅप धाटणीचाच मदरसन सुमी सिस्टिम्स लि.ची शिफारस केल्याशिवाय राहवत नाही.