सुधीर जोशी

बँकांच्या समभागामध्ये गेल्या पंधरा दिवसांत झालेली घसरण चालू सप्ताहात सुरूच राहिली. तरीही सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकांनी अनुक्रमे ३८,८०० आणि ११,५०० ची पातळी कायम राखली. मिडकॅप व स्मॉलकॅप समभागांमधील तेजीबरोबर या सप्ताहात बोलबाला राहिला माहिती तंत्रज्ञान व औषध क्षेत्रातील कंपन्यांचा. त्यांचे क्षेत्रीय निर्देशांक अनुक्रमे सहा व नऊ टक्क्य़ांनी वाढले. एचसीएल टेक्नोलॉजीजने सप्टेंबरअखेर तिमाहीसाठी व्यक्त केलेला भरीव कामगिरीचा अंदाज, इन्फोसिसने ‘गाइडव्हिजन’ या डिजिटल सेवेतील युरोपियन कंपनीचे केलेले अधिग्रहण तसेच टीसीएसची देयक प्रणालीचे अरब देशातील मोठय़ा वित्तीय संस्थेमध्ये कार्यान्वयन, अशा सकारात्मक बातम्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. करोनावरील लशीच्या चाचण्यांच्या सकारात्मक बातम्या व नवनवीन औषधांना परदेशात मिळणारी मान्यता यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सपाटून खरेदी झाली. डॉ. रेड्डीज् लॅबने रशियन वित्तीय संस्थेबरोबर करोना लशीच्या चाचणी व वितरणाचा करार केला त्यामुळे बाजारातील तेजीत कंपनीचे समभाग अग्रभागी राहिले.

गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळालेली हॅपिएस्ट माईंड्स टेक्नॉलॉजीचे समभाग या सप्ताहात बाजारात प्रारंभिक विक्रीच्या दुप्पट किमतीला सूचिबद्ध झाले. अशीच संधी पुढील सप्ताहात येत आहे. गेली दोन दशके भारतीय वित्तीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कॉंप्युटर एज मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस (कॅम्स) या कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री येत्या सोमवारी सुरू होणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून भारतीय बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्राच्या विकासात सहभागी होण्याची संधी गुंतवणूकदारांना येत आहे. सीडीएसएल सारखा या कंपनीच्या उत्पन्नाला घसरणीचा धोका कमी आहे.

स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया लि. (सेल) ने जूनच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले जे करोनाकाळातील नुकसान विचारात घेतले तर अपेक्षेप्रमाणेच होते. चीनकडून गेल्या तीन महिन्यांतील वाढत्या मागणीचा व भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचा फायदा भारतातील पोलाद कंपन्यांना होईल. स्टीलच्या वाढलेल्या किमती व कोळशाच्या किमतीतील घसरण कंपनीच्या पथ्यावर पडेल. सध्याच्या भावात सेलमधील गुंतवणूक वर्षभरात फायदा मिळवून देईल.

भारताची अर्थव्यवस्था धीम्या गतीने पूर्वपदावर येत आहे. करोना संकटामुळे अजून वर्षभर तरी माहिती तंत्रज्ञान, औषध व आरोग्य निगा या क्षेत्रांशी संबंधित कंपन्या प्रकाशात राहाणार आहेत. त्यामुळे संधी येईल तेव्हा यामधील गुंतवणूक वाढविल्यास चांगला लाभ होईल. प्रवाहाविरोधात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी वाहने, पायाभूत सुविधा व बँकिंग क्षेत्रातील खासगी कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीला वाव आहे.

sudhirjoshi23@gmail.com