सुधीर जोशी

गेल्या आठवडय़ातील दमदार वाटचालीनंतरच्या या सप्ताहात बाजाराने वाटचाल सावध केली. मासिक सौदापूर्तीच्या या सप्ताहात बाजार मोठे हिंदोळे घेत सर्वानाच धक्के देत होता. भारत-चीन सीमेवर वरवर शांतता दिसत असली तरी दोन्ही देशांमधील शीतयुद्धाच्या वातावरणामुळे व या वर्षी भारताची अर्थव्यवस्था साडेचार टक्क्याने संकुचित होण्याच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजामुळे बाजारावर विक्रीदबाव राहिला. मात्र सप्ताहाच्या अखेर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांच्या पाठिंब्याने सेन्सेक्सने ३५ हजारांचा टप्पा पार केला. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टीत अनुक्रमे ४४० व १३९ अंकांची वाढ झाली.

आयआरबी इन्फ्रा ही पायाभूत विकास क्षेत्रामधील रस्ते बांधणी व परिचालन व टोल संकलन करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचे निकाल सध्याच्या टाळेबंदीच्या काळात अपेक्षेप्रमाणे उत्साहवर्धक नसले तरी अशा काळावर मात करून पुढील वर्षांसाठी कंपनीने चांगली खबरदारी घेतलेली दिसते. कंपनीने जीआयसी अ‍ॅफिलिएटबरोबर भांडवली गुंतवणुकीचा करार करून मुंबई-पुणे टोल वसुलीचे पुढील वर्षांचे कंत्राटही मिळविले आहे. टाळेबंदीवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी झाल्यामुळे व टोल वसुलीचे दर वाढल्यामुळे सध्याच्या भावात कंपनीमधील गुंतवणूक वर्षांत नफ्याची संधी देईल.

कमिन्स समभाग आठ वर्षांपूर्वीच्या पातळीवर आहे. गेल्या वर्षांतील जागतिक मंदी व पाठोपाठ आलेले करोनाचे संकट यामुळे याही कंपनीच्या कारभारावर परिणाम झाला आहे. कंपनीच्या डिझेल इंजिनांच्या मागणीत करोनामुळे फारशी घट होणार नाही. मजबूत आर्थिक स्थिती व खर्च कमी करण्यासाठी उचललेली पावले पाहता करोनानंतर फायदा करून घेण्यासाठी सध्याचे बाजारमूल्य आकर्षक वाटते.

यूटीआय म्युच्युअल फंडाला सार्वजनिक प्रारंभिक भाग विक्रीसाठी सेबीने मंजुरी दिली आहे. तुलनेसाठी मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांमध्ये एचडीएफसी व निप्पॉन इंडिया या दोनच सूचिबद्ध कंपन्या आहेत. या कंपन्यांचे मूल्यांकन (किंमत उत्सर्जन गुणोत्तर) ४०च्या आसपास असते. यूटीआय म्युच्युअल फंडाच्या समभागांची विक्रीची किंमत निश्चित झाल्यावर त्यामध्ये गुंतवणुकीचा विचार करता येईल. पण समभाग विक्री सुरू होण्यापूर्वी मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांचे पुनर्मूल्यांकन होईल. एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे बाजारमूल्य सध्या कंपनीच्या प्रवर्तकांकडून निर्गुतवणूक झाल्यामुळे खाली आले आहे व त्यामुळे एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंटच्या समभागात अल्प काळात मोठा नफा मिळवण्याची संधी आहे.

करोनाचे संकट आल्यावर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात मार्च महिन्यात ६६ हजार कोटींची विक्री केली होती. मात्र गेल्या तीन महिन्यांत ४४ हजार कोटी पुन्हा गुंतविले आहेत. त्यामुळे या काळात निफ्टी ३५ टक्क्यांनी वाढला आहे. करोना संकटाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे व त्याचा कंपन्यांच्या उत्सर्जनावर वर्षभर तरी परिणाम जाणवेल. त्यामुळे आपल्या पोर्टफोलिओमध्ये रोख शिलकीलाही तेवढेच महत्त्व द्यायला हवे.

पुढील आठवडय़ात टाटा स्टील, आयटीसी, भारत फोर्जसारख्या कंपन्यांचे वार्षिक निकाल व जून महिन्याच्या वाहन विक्रीच्या आकडय़ांवर बाजार प्रतिक्रिया देईल.

sudhirjoshi23@gmail.com