25 November 2020

News Flash

बाजार-साप्ताहिकी : कसोटीचा काळ

सप्ताहअखेर अमेरिकेतील करोनाची वाढती चिंता, युरोपीयन देशांनी जाहीर केलेली टाळेबंदी यामुळे बाजारात थोडी नफावसुली झाली

(संग्रहित छायाचित्र)

सुधीर जोशी

दिवाळीच्या मुहूर्ताला भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकावर बंद झाले. अमेरिकेच्या निवडणुकांबाबत आलेली स्पष्टता, करोनावरील लशीबाबत उंचावलेल्या आशा व बिहार निवडणुकांमधील भाजप आघाडीचे यश यामुळे बाजारात उत्साह वाढला. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या १५ दिवसांत केलेल्या ३०,००० कोटी रुपयांहून जास्त गुंतवणुकीमुळे मंदीवाल्यांना डोके वर काढू दिले नाही.

सप्ताहअखेर अमेरिकेतील करोनाची वाढती चिंता, युरोपीयन देशांनी जाहीर केलेली टाळेबंदी यामुळे बाजारात थोडी नफावसुली झाली. तरीही साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टी सलग तिसऱ्या सप्ताहात वरच्या टप्प्यावर बंद झाले. रिझव्‍‌र्ह बँकेने लक्ष्मी विलास बँक ही डीबीएस बँकेत विलीन करून ठेवीदारांचे हित जपले; परंतु भागधारकांना मात्र वाऱ्यावर सोडले. लहान बँकांमधील गुंतवणूक कशी धोकादायक ठरते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. अनेक लहान गुंतवणूकदार कमी किमतीमधील समभाग घेतात व फसतात त्यांच्यासाठीदेखील हा धोक्याचा इशारा आहे. बँकांचे समभाग घेताना गुंतवणूकदारांनी संबंधित बँकांचे पर्याप्त भांडवलाचे प्रमाण (कॅपिटल अ‍ॅडिक्वसी रेश्यो) १४च्या वर असल्याची खात्री करावी.

पोलाद उद्योग करोनापूर्व स्थितीला येत असल्याची चिन्हे दिसत आहेत. टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) यांसारख्या कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीत भरीव कामगिरी केली आहे. या कंपन्यांचे विक्रीचे आकडे वाढले आहेतच. शिवाय नफ्याचे आकडेदेखील लवकरच वाढू लागतील, कारण उत्पादनांच्या किमतीही वाढत आहेत. सेलने ऑक्टोबरमध्ये आधीच्या महिन्यापेक्षा २१ टक्के अधिक विक्री नोंदविली आहे. टाटा स्टील तिच्या युरोपमधील तोटय़ात चालणाऱ्या कंपन्या स्वावलंबी करण्याच्या हालचाली करीत आहे. केंद्र सरकारच्या उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनेत स्पेशल स्टीलचा समावेश हा पोलाद कंपन्यांच्या फायद्याचाच आहे.

ग्राहक उपभोग्य वस्तूंमधील अग्रणी नाव म्हणजे हिंदुस्तान यूनिलिव्हर, नेस्ले इंडिया, डाबर व ब्रिटानिया या कंपन्यांना टाळेबंदीत फायदा झाला. शहरी भागाबरोबर ग्रामीण भारतातही त्यांच्या विक्रीत वाढ होत आहे. नेस्ले इंडिया ही कंपनी सरकारच्या उत्पादन निगडित प्रोत्साहन योजनेचा फायदा घेण्यासाठी भारतातील उत्पादनात वाढ करून निर्यात वाढविण्याच्या योजना आखत आहे. लोकांच्या आरोग्यविषयक जागरूकतेचा फायदा घेण्यासाठी डाबर, हिंदुस्तान यूनिलिव्हर कंपन्या उत्पादन श्रेणी वाढवीत आहेत. या कंपन्यांच्या लाभांशाचे प्रमाणही अधिक असते. बाजारातील मोठय़ा पडझडीच्या काळात यामध्ये कमी नुकसान होते. त्यामुळे अशा कालावधीत या कंपन्यांचा अंतर्भाव आपल्या पोर्टफोलियोमध्ये असायला हवा.

अर्थव्यवस्थेतील बरेच संकेत हे वेगवान प्रगतीचे निर्देश देत आहेत. एकीकडे सेन्सेक्सच्या ५०,०००ची भाकिते होत आहेत, तर दुसरीकडे करोनाच्या दुसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविली जात आहे. दिवाळीला जाणवलेली खरेदीतील वाढ पुढे कायम राहते का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. निर्देशांक उच्चांकी पातळीला असताना (निफ्टीचा पीई रेशो ३५) खरेदीचे निर्णय धोक्याचे ठरू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा कसोटीचा काळ आहे. नफा झालेल्या कंपन्यांमध्ये थोडी नफावसुली करून बाजाराच्या प्रत्येक खालच्या पातळीवर ग्राहकभोग्य वस्तू, औषधनिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, पोलाद अशा क्षेत्रांतील कंपन्यांमधील गुंतवणुकीचे प्रमाण वाढविता येईल.

sudhirjoshi23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:11 am

Web Title: market weekly article on capital market test period abn 97
Next Stories
1 अर्थवृद्धी अंदाजात सुधार
2 सेन्सेक्स, निफ्टीत घसरण
3 करोनाचे वित्तधक्के २०२५ पर्यंत?
Just Now!
X