सुधीर जोशी

गेले दोन आठवडे मोठय़ा फरकाने वर जाणाऱ्या बाजारात या सप्ताहात नफावसुली झाली. सणासुदीच्या उंबरठय़ावर सरकारने जाहीर केलेल्या गुंतागुंतीच्या अर्थ-प्रोत्साहनास बाजाराने थंड प्रतिसाद दिला. थोडय़ा नरमाईने सुरुवात होऊन कंपन्यांच्या तिमाही निकालांचे वेध घेत बाजाराला या सप्ताहात दररोज कुणी ना कुणी तारणहार सापडत होता. कधी रिलायन्स, कधी माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, तर कधी बँकांचे समभाग बाजाराला पाठबळ देत होते. गुरुवारी मात्र युरोपातील करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा टाळेबंदीच्या शक्यतेने बाजाराला ढासळायला कारण दिले. सर्वोच न्यायालयाने स्थगित हप्त्यांवरील व्याज आकारणीबाबत सुनावणी पुढील महिन्यांत ढकलली त्यामुळे बँकांच्या समभागातही विक्री झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांमध्येही निकाल आल्यावर नफावसुली झाली. गेले दोन सप्ताह मिळून आठ टक्क्यांनी वर गेलेले निर्देशांक दीड टक्क्यांनी खाली आले.

या सप्ताहात निकाल जाहीर झालेल्या इन्फोसिसने दुसऱ्या तिमाहीतील नफ्यात वार्षिक तुलनेत २० टक्के वाढ जाहीर करून, विप्रो व टीसीएसवर बाजी मारली. नवीन मिळालेली मोठी कंत्राटे, पुढील वर्षांत होणारी नोकरभरती व कर्मचारी टिकविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनी  इन्फोसिसने भविष्याच्या मोठय़ा उलाढालीचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षभरासाठी या क्षेत्रातील कुठल्याच कंपनीमध्ये नफारूपी विक्री करणे धाडसाचे ठरेल. बाजारातील कुठल्याही पडझडीत इन्फोसिसमधील गुंतवणुकीत भर घालणेच इष्ट ठरेल.

अर्थव्यवस्था आक्रसणार असल्याची टक्केवारी विविध संस्थांकडून वर्तविली जात आहे. बाजाराने ही शक्यता गृहीत धरली आहे. त्यामुळे बाजारात त्यावर फारशी प्रतिक्रिया उमटत नाही. अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे आडाखे बांधताना पुढील आठवडय़ात एचडीएफसी बँक, डी-मार्ट, हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया, बजाज समूहातील कंपन्यांचे निकाल पाहणे औत्स्युक्याचे ठरेल. करोना संकटाशी निगडित घटना व अमेरिकी निवडणुका या दोनच गोष्टी सध्या बाजारावर परिणाम करू शकतात. पण मोठय़ा पडझडीच्या वेळी निवडक खरेदीची चांगली संधी मिळते कारण अर्थचक्र पूर्वपदावर येत आहेच.

sudhirjoshi23@gmail.com