सुधीर जोशी

परदेशी भांडवली गुंतवणूकदारांच्या वाढत्या निधी ओघामुळे भारतीय बाजारातील चैतन्य टिकून राहिले. अ‍ॅक्सेंचरने पुढील वाटचालीबद्दल दिलेल्या भक्कम संकेतांमुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वच समभागांना बळ मिळाले. करोना संकटातून मिळणारा दिलासा व अमेरिकी फेडरल बँकेच्या आशावादी संकेतांमुळे बाजाराचे निर्देशांक प्रत्येक दिवशी सहजपणे नवी शिखरे गाठत सलग सातव्या सप्ताहात वरच्या टप्प्यावर बंद झाले.

करोनापश्चात कारभारात सुधारणा होण्याची शक्यता असलेल्या कंपन्यांपैकी व्हीआरएल लॉजिस्टिक व आयआरसीटीसी या कंपन्यांचा गुंतवणुकीसाठी विचार करता येईल. माल वाहतुकीच्या संघटित क्षेत्रातील व्हीआरएल लॉजिस्टिक या एका मोठय़ा कंपनीचा उद्योग देशात सर्वत्र पसरलेला आहे. पहिल्या सहामाहीत टाळेबंदीमुळे घसरलेला आलेख पूर्ववत होण्याची चिन्हे कंपनीच्या पुढील दोन महिन्यांच्या उलाढालीमध्ये दिसून येत आहेत. कंपनीसमोर कुठलाही भांडवली खर्च अपेक्षित नाही. तसेच खर्चावरील नियंत्रण व मिळणाऱ्या उत्पन्नातून कंपनीने कर्जाचे प्रमाणही कमी केले आहे. रेल्वेसेवा बंद राहिल्यामुळे ज्या कंपनीच्या नावातच पर्यटन व खानपान सेवेचा अंतर्भाव आहे अशा – आयआरसीटीसीच्या समभागांवर बाजारात विक्रीचा दबाव राहिला नाही तरच नवल! आयआरसीटीसीमधील भांडवली हिस्सा कमी करण्यासाठी सरकारने केलेल्या विक्रीला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. वर्षभरात या कंपन्यांमधील गुंतवणूक चांगला नफा देऊ शकते.  बर्गर किंगच्या नव्याने सूचिबद्ध झालेल्या समभागांची नावाप्रमाणे राजेशाही वाटचाल सर्वाना चकित करणारी ठरली. रोज वरची ‘खरेदी बंद’ पातळी गाठणाऱ्या समभागाला गुरुवारी व शुक्रवारी मात्र ‘विक्री बंद’ची पातळी अनुभवणे भाग पडले. नव्या कंपनीच्या अवास्तव वाढीमध्ये थोडी नफाकमाई नेहमीच फायद्याची ठरते. त्याच वाटेवर असणाऱ्या मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीच्या पुढील सप्ताहात सूचिबद्ध होणाऱ्या समभागांमध्ये नशीबवान गुंतवणूकदारांनी थोडय़ा नफा-वसुलीचे धोरण ठेवायला हवे. अँटोनी वेस्ट हँडलिंगची प्राथमिक समभाग विक्री सोमवारी सुरू होत आहे. घन कचरा वर्गीकरण व विल्हेवाट लावणारा हा उद्योग उदयोन्मुख क्षेत्रात आहे. सध्याच्या तेजीच्या पर्वात प्रत्येक संधीमध्ये नशीब आजमावून बघायला हरकत नाही.

बाजारातील तेजीला खीळ बसेल असे सध्या तरी काही दृष्टिक्षेपात नाही. करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होऊन दुसऱ्या लाटेची शक्यता कमी होत आहे. दिवाळीनंतरही ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी फारशी कमी झालेली नाही. नवीन घरांच्या खरेदीमध्ये वाढ होत आहे.

राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड पट जास्त कंत्राटे दिली आहेत. पोलादाच्या किमतीत वाढ होत आहे. जो मागणीतील वाढीचा परिणाम आहे. व्याज दर स्थिर आहेत.

परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ संपत नाही. या सकारात्मक बाबींमुळे गुंतवणूकदारांचा बाजारावरील विश्वास टिकून आहे व बाजाराचे निर्देशांक दररोज नव्या उच्चांकाची नोंद करत आहेत. गुंतवणूकदारांचा तेजीमध्ये सहभाग असायलाच हवा; मात्र दररोज थोडी नफावसुली करून अनपेक्षित धक्क्यांसाठी तयारही असायला हवे.