सुधीर जोशी

गेल्या सप्ताहाप्रमाणेच या सप्ताहातही दमदार सुरुवात करून भांडवली बाजाराने गुरुवारचा अपवाद वगळता तेजीकडेच कल दाखविला. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टीमध्ये अनुक्रमे ५५७ व १९३ अंकांची वाढ झाली. अनेक मिड कॅप व स्मॉल कॅप कंपन्यांचा सहभाग र्सवकष तेजीचे संकेत देत होता. या सप्ताहातही माध्यम व बांधकाम क्षेत्रातील कंपन्या आघाडीवर होत्या. त्यातील सन टीव्ही, पीव्हीआर, शोभा लिमिटेड, फिनिक्स मिल्स यांचा विचार करता येईल.

एसबीआय लाइफ व डिव्हिज लॅब  कंपन्यांमधील खरेदी-विक्रीत गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग यापूर्वी लिहिल्याप्रमाणे त्यांच्या भविष्याचे द्योतक आहे. व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्सचे तिमाही निकाल आशादायक आहेत. टाळेबंदीचा कंपनीच्या मागणीवर परिणाम झालेला तिमाही निकालात दिसत नाही.

कंपनी गेल्या काही वर्षांपासून कर्जमुक्त स्थितीत असून तिने विविध उत्पादन क्षमतांमध्ये गुंतवणूक केली आहे. कंपनी आपल्या भांडवलाचा अतिशय कार्यक्षमतेने वापर करत असल्याने भांडवली परतावा आकर्षक आहे. कंपनीकडे पुरेशा ग्राहकांनी विचारणा के ली असून त्याचे मागणीत रूपांतर होण्यास टाळेबंदीमुळे अडथळा निर्माण होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भविष्यातील एक आश्वासक कंपनी म्हणून या कंपनीकडे पाहता येईल.

व्ही-गार्ड इंडस्ट्रीजच्या पहिल्या तिमाहीत विक्रीत ४२ टक्के घट तर नफ्यात ९२ टक्के घट झाली असली तरी मजबूत भांडवली स्थिती, खर्चावरील नियंत्रण व योग्य वेळी केलेली स्वत:च्या उत्पादनांची सुरुवात कंपनीला कठीण काळातून सहज बाहेर काढण्यास मदत करेल. इन्व्हर्टर्स, व्होल्टेज स्टॅबिलायझरसारख्या उत्पादनांपासून सुरुवात केलेल्या या कंपनीने गिझर, पंखे, सौरऊर्जा उपकरणे अशा विविध उत्पादनांकडे वाटचाल करून आपली नाममुद्रा विकसित केली आहे. गुंतवणुकीसाठी ही सध्या आकर्षक संधी वाटते.

बाजारातील सध्याची तेजी पुढील वर्षांच्या कामगिरीकडे नजर ठेवून होत आहे. येत्या सहा महिन्यांत कंपनी प्रगतीबाबत कमी पडली तरच त्यामध्ये मोठी घसरण होऊ शकते. शेती, माहिती तंत्रज्ञान व रसायन उद्योगांमध्ये तरी अशी शक्यता सध्या वाटत नाही. सध्याचे लहान-मोठे चढ-उतार हे लाक्षणिकच राहतील, असे वाटते. परंतु सावधगिरी बाळगत निवडक समभागांचा टप्प्याटप्प्याने समावेश करायला हरकत नाही.

sudhirjoshi23@gmail.com