24 November 2017

News Flash

‘बँड्र, पेटंटकडे दुर्लक्ष नको; विपणनकौशल्यही महत्त्वाचे’

उत्पादनाची प्रसिद्धी करण्यासाठी किंवा ते लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ब्रॅण्डिंग महत्त्वाचे असते.

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: September 12, 2017 2:43 AM

प्रा. डॉ. मृदुला बेळे, मीनल मोहाडीकर आणि अ‍ॅड. मृणालिनी वारूंजीकर तिसऱ्या परिसंवादाच्या मंचावर.

स्पर्धेच्या युगात ब्रॅण्ड, पेटंट, कॉपीराइट याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पेटंट हे सक्तीचे नसले तरी आपल्या उत्पादनाची कोणी नक्कल करू नये, ही काळजी घ्यायची असेल, तर ते आवश्यक आहे. मात्र प्रत्येक देशात वेगळे पेटंट काढावे लागते व त्यासाठी बऱ्याच प्रक्रिया पार पाडाव्या लागतात, अशा महत्त्वपूर्ण बाबींचा ऊहापोह ‘नाममुद्रा, बौद्धिक संपदा, बाजारपेठ’ चर्चासत्रात करण्यात आला.

उद्योगांच्या हितासाठी व व्यवसाय वृद्धीसाठी त्यांचे उत्पादन हे संरक्षित असले पाहिजे, त्याची कोणी नक्कल करून अवाजवी लाभ घेता कामा नये, अशा विविध बाबींसाठी पेटंट काढणे आवश्यक असते. तर उत्पादनाची प्रसिद्धी करण्यासाठी किंवा ते लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ब्रॅण्डिंग महत्त्वाचे असते. त्या दोन्हींसाठी बारकावे कोणते, कोणती दक्षता घ्यायला हवी, यावर सांगोपांग विचार करण्यात आला. व्यावसायिकांनी संवादकौशल्य व मार्केटिंगचा परिणामकारक वापर करायला हवा, असाही सूर त्यात व्यक्त करण्यात आला.

पेटंटचे संरक्षण त्या त्या देशापुरतेच..

  • आपल्या उत्पादनाची कोणी नक्कल करू नये, म्हणून ‘पेटंट’ काढण्यासाठी उद्योजक पुढे येत असले तरी अनेक बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. नावीन्यपूर्ण उत्पादन, प्रक्रिया याचे पेटंट घेता येते. ते त्या देशापुरते असते व ज्या देशात उत्पादन पाठवायचे असेल, तेथे ते स्वतंत्रपणे काढावे लागते. शास्त्रीय संशोधनाचे किंवा स्वाभाविकपणे विकसित होणाऱ्या बाबींचे पेटंट काढता येत नाही, त्यात नावीन्यपूर्णता असावी लागते. पेटंट व ब्रॅण्ड यात फरक आहे. ब्रॅण्डचा वापर उत्पादनाचा खप वाढविण्यासाठी करता येतो आणि त्याची नोंदणी करून ते संरक्षित करता येते. त्यामुळे दुसऱ्याला त्या ब्रॅण्ड नेम, लोगो, टॅग लाइनचा वापर इतरांना करता येत नाही. मात्र त्यांना उत्पादननिर्मितीसाठी थांबविता येत नाही.

प्रा. डॉ. मृदुला बेळे, बौद्धिक संपदा व पेटंट सल्लागार

बिल्डरांविरोधातही ग्राहक संरक्षण मंचाचा पर्याय

  • वैद्यकीय निष्काळजीपणा, योग्य दर्जाचा माल न पुरविणे, कबूल केलेल्या सेवा न देणे आदी कोणत्याही बाबींसाठी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार मंचाकडे दाद मागता येते. बिल्डरांकडून कबूल केल्याप्रमाणे मुदतीत सदनिकांचा ताबा दिला जात नाही, सुविधा पुरविल्या जात नाहीत, भोगवटा प्रमाणपत्रासह अन्य बाबींची पूर्तता होत नाही, अशा कोणत्याही तक्रारींसाठी ‘महारेरा’ कडे दाद मागता येईल. मात्र ही यंत्रणा अजून नवीन असून आदेशांच्या अंमलबजावणीतील बाबींविषयी संदिग्धता आहे. मात्र ग्राहक संरक्षण मंचाकडे दाद मागण्याचा सदनिकाधारकांचा किंवा सर्वसामान्यांचा अधिकार अबाधित आहे. बिल्डरांकडून फसवणूक झाल्यास दिवाणी व फौजदारी कारवाई करण्याचा मार्ग खुला आहे.

अ‍ॅड. मृणालिनी वारुंजीकर, ग्राहक कायदेतज्ज्ञ

मार्केटिंग तंत्र व संवादकौशल्य महत्त्वाचे

  • लघू व मध्यम उद्योजकांनी सदैव आपल्या उद्योगाचा विचार डोक्यात ठेवून वेगवेगळ्या मार्गानी मार्केटिंगचे तंत्र कसे अवलंबिता येईल व संवादकौशल्याचा वापर कसा करता येईल, हे पाहिले पाहिजे. लघुउद्योजकांनी उद्योगवृद्धीसाठी किमान बाबींची माहितीही करून घेतली पाहिजे. उद्योग आधार, शासकीय नोंदणी, अन्नप्रक्रिया उद्योगांसाठीच्या नोंदण्या आदींची माहिती घेऊन पावले टाकल्यास शासकीय कामेही मिळू शकतात, शासकीय योजनांचा लाभ घेता येतो. त्यासाठीची माहिती या उद्योजकांनी विविध माध्यमांमधून मिळविली पाहिजे. प्रयत्न, संघटनकौशल्य, समूह शक्ती, दूरदृष्टी, नावीन्यपूर्णता आदींवर भर देऊन गुणवत्ता जोपासली पाहिजे.

मीनल मोहाडीकर, उपाध्यक्षा, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ

First Published on September 12, 2017 2:43 am

Web Title: marketing strategies brand patent important loksatta badalta maharashtra