• ४१० अंश आपटीने सेन्सेक्स पाच महिन्यांच्या तळात
  • शतकी घसरणीमुळे निफ्टी निर्देशांक १० हजाराखाली

अमेरिकेच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या जागतिक व्यापार युद्धाचे पडघम शुक्रवारी येथील भांडवली बाजारात मोठय़ा स्वरूपात वाजले. चिनी उत्पादनांवर अमेरिकेने लागू केलेल्या आयात शुल्कामुळे सेन्सेक्सने सप्ताहअखेरच्या एकाच व्यवहारात जवळपास ४१० अंशांनी आपटत ३२,६०० खाली येऊन ठेपला, तर निफ्टीने शतकी निर्देशांक घसरणीने १० हजाराचा स्तरही सोडला.

मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकामध्ये आठवडय़ाच्या शेवटच्या व्यवहारात एक टक्क्याहून अधिक घसरण नोंदली गेली. एकटय़ा मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता यामुळे १.५७ लाख कोटी रुपयांनी कमी झाली.

४०९.७३ अंश घसरणीने सत्रअखेर मुंबई निर्देशांकाचा ३२,५९६.५४ हा गेल्या पाच महिन्यातील किमान स्तर राहिला. निर्देशांक यापूर्वी २३ ऑक्टोबर २०१७ रोजी शुक्रवारच्या समकक्ष होता. तर शतकी निर्देशांक घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक त्याच्या १० हजाराच्या अनोख्या टप्प्यापासून दुरावला. ११६.७० अंश घसरणीने निफ्टी ९,९९८.०५ पर्यंत खाली आला. निफ्टीचा यापूर्वी ११ ऑक्टोबर २०१७ रोजी ९,९८४.८० असा किमान स्तर होता.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध चिनी वस्तूंवर ५० अब्ज डॉलरचे आयात शुल्क लागू केले. यामुळे जागतिक बाजारातही व्यापार युद्धाबाबतची भीती व्यक्त झाली. आशियातील विविध प्रमुख निर्देशांकांमध्ये ४.५१ टक्क्यांपर्यंतची आपटी नोंदली गेली, तर सप्ताहअखेरची युरोपीय बाजारांची सुरुवातही घसरणीची होती.

पोलाद तसेच बँक क्षेत्रातील समभागांवर विक्रीचा अधिक दबाव राहिला. सेल, जिंदाल स्टील, वेदांता, हिंदाल्को, जिंदाल स्टील, नॅशनल अ‍ॅल्युमिनिअम, हिंदुस्थान झिंक, टाटा स्टील, एनएमडीसी, जेएसडब्ल्यू स्टील आदी ६.५८ टक्क्यांपर्यंत घसरले. तर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या टॉटेम इन्फ्रास्ट्रक्चरवरील कारवाईमुळे आघाडीची तक्रारदार बँक यूनियन बँक ऑफ इंडियासह एकूणच बँक समभागांमध्ये मोठी घसरण नोंदली गेली. यामध्ये पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, इंडसइंड बँकेसह येस बँक, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक यांच्यातील घसरण जवळपास ५ टक्क्यांपर्यंतची राहिली.

सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, बजाज ऑटो, डॉ. रेड्डीज्, रिलायन्स इंडस्ट्रिज, विप्रो, एचडीएफसी लिमिटेड, सन फार्मा, हीरो मोटोकॉर्प, हिंदुस्थान यूनिलिव्हर, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, ओएनजीसी, आयटीसी, टीसीएस, एनटीपीसी आदी २.१० टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, आरोग्यनिगा, सार्वजनिक उपक्रम, वाहन, तेल व वायू हेही घसरणीच्या यादीत राहिले. त्यातील घसरण ३.३१ टक्क्यांपर्यंतची राहिली.

मूल्य तेजीच्या यादीत माहिती तंत्रज्ञान, माध्यम आदी क्षेत्रीय निर्देशांक राहिले. ते ०.३२ टक्क्यापर्यंत वाढले. तर अदानी पोर्ट्स, इन्फोसिस, पॉवरग्रिड, महिंद्र अँड महिंद्र, कोल इंडिया, एशियन पेंट्स हे सेन्सेक्समधील अन्य समभाग एक टक्क्यापर्यंत वाढले.

मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे १.५४ व १.३६ टक्क्यांनी घसरले. साप्ताहिक तेत सेन्सेक्सने सलग चौथी निर्देशांक आपटी नोंदवली आहे. चालू आठवडय़ात मुंबई निर्देशांक ५७९.४६ अंशांनी खाली आला आहे. तर निफ्टीतील या दरम्यानची घसरण १९७.१० अंशांची राहिली आहे.

कारणे काय?

जागतिक भांडवली बाजाराचा प्रवासात आता  स्थानिक पातळीवरील घडामोडींचे पडसाद उमटत असल्याचे दिसून येत आहे. आगामी कालावधीत निफ्टी अधिक घसरला तर तो ९,७०० पर्यंत जाऊ शकतो.    – जिमित मोदी, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, सॅम्को सिक्युरिटीज

जागतिक व्यापार युद्ध भडकण्याबाबत चिंता केवळ स्थानिकच नव्हे जगभरातील सर्वच प्रमुख भांडवली बाजारातील पडझडीचून व्यक्त झाली आहे.  बँकांचा थकित कर्जे घोटाळे, दीर्घकालीन भांडवली लाभ कर आदींमुळे फेब्रुवारीपासूनच येथील प्रमुख निर्देशांकांमध्ये अस्थिरता दिसून येत आहेच.    – देवांग मेहता, प्रमुख समभाग सल्लागार, सेंट्रम वेल्थ मॅनेजमेंट

भांडवली बाजारातील शुक्रवारच्या व्यवहारातील अस्वस्थतेतून प्रमुख निर्देशांकांना मोठय़ा घसरणीचा सामना करावा लागला आहे. जागतिक स्तरावरील व्यापार युद्ध तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत्या खनिज तेल दरांचाही काही परिणाम येथील बाजारांच्या प्रमुख निर्देशांकावर जाणवला.    – विनोद नायर, संशोधक, जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस