अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरवाढीचे संकेत दिल्याने सोमवारी जगभरातील भांडवली बाजार कोसळले. फेडरल रिझर्व्हने व्याजदरांमध्ये वाढ केल्यास अमेरिकन अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळण्याची शक्यता आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अमेरिकेचे महत्त्वपूर्ण स्थान पाहता साहजिकच याचा विपरीत परिणाम जगभरातील अन्य देशांच्या अर्थव्यवस्थांवर होण्याची शक्यता आहे. सध्या व्याजदर वाढीच्या संकेतांमुळे आशियाई बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. तर भारतीय भांडवली बाजारातही याचे विपरीत पडसाद पाहायला मिळत आहेत. आज आठवड्याच्या सुरूवातीलाच भारतीय भांडवली बाजार सुरू झाल्यानंतर मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) तब्बल ५०० अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) तब्बल १४२ अंकांनी खाली आला आहे. सध्या सेन्सेक्स २८,२५१.३१ तर निफ्टी ८७००च्या पातळीखाली जाऊन पोहचला आहे.