उन्हाच्या काहिलीतही खरेदीसाठी सज्जता; बाजारात सवलतींचा वर्षांव

मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या शनिवारच्या गुढीपाडव्याकरिता खरेदीबाजार पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. रणरणत्या उन्हाने मुंबईकरांची काहिली होत असली तरी मराठमोळा सण साजरा करण्याच्या उत्साहाची गुढीही तेवढीच उंच आहे.

विद्युत उपकरणे, गृहोपयोगी वस्तूंकरिता ‘ऑनलाइन’ बाजारपेठही वेगवान आहे.

आघाडीच्या अनेक सराफ पेढय़ांनी सोने दागिन्यांच्या घडणावळीवरील सुटीसह करामध्येही सवलत देऊ केली आहे. लग्नाच्या मोसमामुळे यंदा मुहूर्ताची खरेदी अथवा गुंतवणूक संधीपेक्षा दागिन्यांना अधिक पसंती दिली जात असल्याचे पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांनी सांगितले. वर्षभर सोन्याच्या किमती तोळ्यासाठी ३२ हजारांपर्यंत पोहोचू शकतील, असेही ते म्हणाले.

‘जीएसटी’सह अनेक सवलतींचा आधार देत विकासकांनी त्यांचे निवासी प्रकल्प यंदा नव्याने सादर केले आहेत. नव्या वित्त वर्षांला यंदा ‘रेडी रेकनर’च्या दरातील वाढीची जोड नसल्यानेही घरखरेदीदारांसाठी संधी आहे. तसेच व्यापारी बँकांकडून गेल्या काही महिन्यांपासूनची स्थिर कर्ज व्याजदराची सवलत आहेच. घरखरेदीबरोबर दुचाकी, सोन्याचे नाणे ते नोंदणी, करातील सवलतही देऊ केली जात आहे.

सोने खरेदी वाढणार..

शहरातील सराफ, गृहनिर्माण तसेच वाहन बाजार खास या सणाची मागणी म्हणून सूट-सवलतींसह तयार आहे. महत्त्वाचे मानले जाणाऱ्या सोने खरेदीकरिता यंदा तुलनेत फार न वाढलेल्या किमतीचे आकर्षण आहे. वार्षिक तुलनेत यंदा विक्री ५ ते १० टक्के वाढण्याची आशा सराफी पेढय़ांना आहे.

वाहन बाजारही आशावादी..  सणानिमित्ताने यंदा दुचाकी खरेदीत चढा क्रम कायम राहण्याची शक्यता असून मोसमी पावसाच्या पाश्र्वभूमीवर शेती उपयोगी वाहने खरेदीलाही गुढीपाडव्याचाच मुहूर्त साधला जाण्याचा विक्रेत्यांना विश्वास आहे. वर्षांरंभी निर्माण झालेले कमी विक्रीचे चित्र  गुढीपाडव्याला बदलेल असा वाहन बाजाराला विश्वास आहे.