महिंद्रच्या बोलेरोला बाजूला सारत टाटा टिआगो पहिल्या दहांत

नवी दिल्ली : सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या प्रवासी वाहन गटातील मारुती सुझुकीचा वरचष्मा सरलेल्या फेब्रुवारी महिन्यातही कायम राहिला असून, सर्वाधिक खपाच्या अव्वल १० मध्ये  कंपनीच्या विविध सहा कार आहेत.

गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या पहिल्या १० मध्ये यंदा मारुतीची कट्टर स्पर्धक ह्य़ुंदाई मोटर इंडियाच्या तीन वाहनांना स्थान मिळाले आहे. तर वर्षभरापूर्वी पहिल्या १० मध्ये राहिलेल्या महिंद्रची बोलेरोला बाजूला सारत यंदा टिआगोच्या माध्यमातून टाटा मोटर्सने यादीत शिरकाव केला आहे.

महिन्याला १० हजारांपेक्षा अधिक विक्री झालेल्या प्रवासी वाहन गटात मारुती सुझुकीच्या सहा कारचा समावेश राहिला असून यामध्ये हॅचबॅक, सेदान तसेच कॉम्पॅक्ट एसयूव्ही अशी साऱ्या गटांतील वाहने आहेत. एलाईट आय२०, क्रेटा व ग्रँड आय१० या तीन वाहनांसह ह्य़ुंदाई मोटर इंडियाची तीन वाहने मारुतीच्या वाहनांपाठोपाठ अनुक्रमे सातव्या, आठव्या व नवव्या स्थानावर राहिली आहेत.

फेब्रुवारी २०१८ मध्ये महिंद्र अँड महिंद्रची बोलेरो ८,००१ वाहनांसह १० व्या स्थानावर होती. यंदा हे स्थान टाटा मोटर्सच्या टिआगोने ८,२८६ वाहन विक्रीसह मिळविले आहे.