प्रवासी कारच्या क्षेत्रातील देशातील अग्रणी मारुती सुझुकीच्या नव्या वाहनांची स्पर्धा ही या वर्गवारीतील आपल्याच बडय़ा भावंडांशी पुन्हा एकदा दिसून आले. फेब्रुवारीच्या ६ तारखेला मारुती सुझुकीने ग्रेटर नोएडास्थित ‘ऑटो एक्पो’चे निमित्त साधून वितरणासाठी सज्ज केलेली ‘सेलेरिओ’ लवकरच मारुतीच्या सर्वाधिक संख्येने विकल्या जाणाऱ्या ‘अल्टो’ला मागे टाकेल, अशी सुचिन्हे दिसत असल्याचे वाहन विश्लेषकांचे म्हणणे आहे.
वाहन उत्पादकांची शिखर संघटना ‘सिआम’कडून जाहीर होत असलेल्या दर महिन्याच्या वाहन विक्रीच्या आकडेवारीनुसार मारुतीची ‘अल्टो’ ही सर्वाधिक विकली जाणारी मोटार आहे. ‘अल्टो’ची विक्री दरमहा २१ ते २५ हजारांदरम्यान आहे. नवीन ‘सेलेरिओ’ वितरणासाठी सज्ज झाली असून सध्या मारुतीच्या वितरकांकडे रोजची हजार-बाराशे कारची मागणी नोंदविली जात असल्याचे कळते. एकूण मागणीचा अंदाज घेत, मारुतीकडून मार्च महिन्यात प्रत्यक्ष उत्पादनाला प्रारंभ होणार आहे.
मार्च या पहिल्या महिन्यातच मारुती पाच ते सहा हजार ‘सेलेरिओ’ विकेल असा अंदाज असून आíथक वर्ष २०१४-१५ मध्ये विकलेल्या एकूण वाहनांच्या संख्येत १०% वाढ केवळ ‘सेलेरिओ’मुळे दिसून येईल. परंतु ‘सेलेरिओ’ मारुतीच्याच ‘व्ॉगन आर’, ‘अल्टो’ यांच्याशी स्पर्धा करेल. सेलेरिओ ही एक हॅचबॅक श्रेणीतील मोटार आणि या वर्गवारीत प्रथमच ‘ऑटो गिअर शिफ्ट’ प्रकारात उपलब्ध झाली असल्यामुळे ग्राहकांची तिला पसंती लाभत असल्याचे मुंबईतील आघाडीच्या मारुती विक्रेत्याने सांगितले. मुंबईत विक्री दालनात सेलेरिओची किंमत चार लाख दहा हजारांपासून सुरू होत असून, अंतरिम अर्थसंकल्पात अबकारी करात कपात केल्यामुळे ही किंमत आणखी कमी होणार आहे. आदर्श परिस्थितीत सेलेरिओ एका लिटरमध्ये २३.१ किलोमीटरचे अंतर कापेल, या कंपनीच्या दाव्यामुळे एक इंधन कार्यक्षम वाहन म्हणूनही ग्राहकांना या नवीन मोटारीची प्रतीक्षा आहे.