चलनातील अस्थिरता आणि कच्च्या तसेच आयात मालाच्या किंमतीतील फरक यामुळे वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय मारुती, ह्य़ुंदाई या देशातील पहिल्या दोन क्रमांकाच्या कंपन्यांनी घेतला आहे.
देशातील सर्वात मोठय़ा मारुती सुझुकीनेही २०१५ पासून किंमत वाढ जारी केली आहे. कंपनीने तिच्या सर्व वाहनांच्या किंमती २ ते ४ टक्क्य़ांनी वाढविण्याचे घोषित केले आहे. कंपनीने यापूर्वी ऑक्टोबर २०१३ मध्ये किंमत वाढीचा निर्णय लागू केला होता. भारतात १३ हून अधिक विविध वाहन प्रकार विकणाऱ्या मारुतीची सध्या सर्वात कमी किंमतीतील वाहन अल्टो ८०० हे २.३७ लाख रुपयांना असून सर्वाधिक किंमत ग्रॅन्ड व्हिटारा हे २४.६० लाख रुपयांना आहे.
देशातील दुसऱ्या क्रमांकाची प्रवासी कार उत्पादक कंपनी हय़ुंदाई इंडियानेही नव्या वर्षांपासून किंमतवाढीची घोषणा केली आहे. एरवी निर्यातीत वरचढ राहणाऱ्या मूळच्या कोरियन कंपनीच्या भारतीय कंपनीने तिच्या सर्व कारच्या किमती जानेवारीपासून २५ हजार रुपयांपर्यंत वाढवत असल्याचे जाहीर केले आहे.
कंपनीने किमान किंमतवाढ ५ हजार रुपयांची निश्चित केली आहे. या माध्यमातून कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींचा भार ग्राहकांवर लादण्यावाचून तूर्त पर्याय नाही, असेही कंपनीने याबाबत स्पष्ट केले आहे. कंपनीला घसरत्या रुपयाचाही फटका बसत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कंपनीची विविध १० हून अधिक प्रकारची वाहने भारतात तयार केली व विकली जातात. कंपनीचे सर्वात कमी किमतीचे वाहन इऑन असून त्याची किंमत २.८७ लाख रुपये आहे, तर सॅन्टा फे या सर्वात महागडय़ा वाहनाची किंमत २५.६० लाख रुपयांपुढे आहे.
गेल्याच आठवडय़ात जर्मन बनावटीच्या बीएमडब्ल्यूने जानेवारीच्या पहिल्याच आठवडय़ापासून तिच्या आलिशान वाहनांच्या किमती ५ टक्क्य़ांनी वाढविण्याचे घोषित केले होते. शेव्‍‌र्हले नाममुद्रेसह स्पार्क, तवेरा, बीट, क्रूझ आदी वाहने तयार करणाऱ्या जनरल मोटर्सनेही १ जानेवारीपासून २० हजार रुपयांनी वाहनांच्या किमती वाढविण्याचे निश्चित केले आहे.