News Flash

छोटय़ा कारमध्ये मारुतीला स्वस्त व मस्त पर्याय

टाटा मोटर्सच्या नॅनोलाही किमतीबाबत तुल्यबळ, तर मारुती सुझुकीच्या अल्टो ८०० पेक्षाही स्वस्त कार रेनो इंडियाने गुरुवारी सादर केली.

रेनो इंडियाची क्विड हॅचबॅक दाखल
टाटा मोटर्सच्या नॅनोलाही किमतीबाबत तुल्यबळ, तर मारुती सुझुकीच्या अल्टो ८०० पेक्षाही स्वस्त कार रेनो इंडियाने गुरुवारी सादर केली. फ्रेंच कंपनीची ही भारतातील पहिली परिपूर्ण हॅचबॅक कार असून तिची किंमत २.५७ लाख रुपयांपासून (एक्स शोरुम, नवी दिल्ली) पुढे सुरू होत आहे.
भारतात छोटय़ा प्रवासी कार बाजारपेठेत सध्या मारुती सुझुकीचा वरचष्मा आहे. कंपनीची अल्टो ही स्वस्त कारमध्ये सर्वाधिक विकले जाणारे वाहन आहे, तर त्यापेक्षा स्वस्त टाटा मोटर्सची नॅनो आहे. याशिवाय या स्पर्धेत मूळच्या कोरियन कंपनीचे इऑन हे वाहनही आहे.
८०० सीसी क्षमतेच्या व २५.१७ किलोमीटर प्रति लिटर इंधन क्षमता देणाऱ्या या कारचे बाह्य़रूप एसयूव्हीप्रमाणे आहे. या वेळी रेनो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सुमित साहनी व विक्री विभागाचे उपाध्यक्ष राफेल ट्रेगर हे उपस्थित होते.
भारतात छोटय़ा प्रवासी वाहनांचा हिस्सा एकूण वाहनांपैकी २५ टक्के आहे, तर डस्टर या कॉम्पॅक्ट एसयूव्ही वाहन श्रेणीत आघाडीवर असलेल्या रेनोकडे २ टक्के बाजारपेठ आहे. ती २०१७ पर्यंत ५ टक्क्यांवर जाईल, असा विश्वास यावेळी सुमित साहनी यांनी व्यक्त केला. मारुतीच्या तुलनेत स्वस्त असणाऱ्या या कारचा देखभाल खर्चही स्पर्धक वाहनापेक्षा १९ टक्क्यांनी कमी असल्याचा दावा रेनो इंडियामार्फत येथे करण्यात आला. चालू वर्षअखेर कंपनीची देशभरात २०५ विक्री व सेवा केंद्रे असतील, असेही या वेळी सांगण्यात आले.
हॅचबॅक श्रेणीत रेनो इंडियाने पल्स हे वाहन काही वर्षांपूर्वी सादर केले होते. मर्यादित निर्मिती व विक्री असलेल्या या कारची किंमत ५ ते ७ लाख रुपये दरम्यान आहे. याशिवाय कंपनीने आपल्या लॉजी या वाहनाद्वारे गेल्या महिन्यात बहुपयोगी वाहन श्रेणीत प्रवेश केला.
भारतात सध्या मारुतीच्या अल्टो या कारची महिन्याला २३ हजार तर इऑनची ६,००० विक्री होते. टाटा मोटर्सच्या नॅनोने मासिक ५,००० वाहन विक्रीपर्यंतचा टप्पा गाठला आहे.

छोटय़ा कारची किंमत स्पर्धा

टाटा मोटर्स नॅनो
रु. १.९९ ते २.५३
मारुती सुझुकी अल्टो ८००
रु. २.५२ ते ३.७२
ह्य़ुंदाई इऑन
रु. ३.१० ते ४.२७
(किमती लाख रुपयांत)

नव्या ‘क्विड’सह रेनो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सुमित साहनी व विक्री विभागाचे उपाध्यक्ष राफेल ट्रेगर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 4:48 am

Web Title: maruti is best option for small cars
Next Stories
1 अभियंत्याने उघडले डोळे..फोक्सवॅगन : अशी ही बनवाबनवी
2 मुंबईतील न विकली गेलेली ६९ टक्के घरे कोटीहून अधिक किमतीची : सर्वेक्षण
3 मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांना जादा भांडवल पुरवा
Just Now!
X