ऐन गर्दीत वाहनाचा गीअर सारखे बदलणे आणि त्यामुळे परिणामी वाढत्या इंधनात अधिकच भर. अगदी नवशिका वाहनचालक नसला तरी सततच्या गीअर बदलामुळे ड्रायव्हिंगच्या मजेला मुकणाऱ्यांची खास दखल देशातील पहिल्या क्रमांकाच्या मारुती सुझुकीने घेतली आहे.
‘सेलेरिओ’ ही हॅचबॅक श्रेणीतील कार सादर करताना कंपनीने प्रथमच या वाहन प्रकारात ‘ऑटो शिफ्ट गिअर’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय ३.९० लाख रुपये ते ४.९६ रुपयांमध्ये प्रतिलिटर २३.१ किलोमीटरची इंधन क्षमताही यात आहे. दोन विविध प्रकारांत असलेली ही कार गुरुवारी ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली. या वेळी कंपनीचे   मुख्य कार्यकारी मयंक पारिख हे उपस्थित होते.
कंपनीने प्रथमच अमलात आणलेल्या छोटय़ा वाहनातील या नव्या तंत्रज्ञानाबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी केनिजी आयुकावा यांनी सांगितले की, आम्ही विकसित केलेले हे तंत्रज्ञान भारतीय प्रवासी वाहन क्षेत्रात (छोटय़ा कार) प्रथमच अंतर्भूत करण्यात आले आहे. यामुळे अधिक मायलेजही मिळेल. गीअर न बदलताही हे मायलेज मिळू शकेल.
त्याचबरोबर चालकाला वाहन चालविण्याची मजाही कायम राखता येईल. तुलनेने या वाहनाचा देखभाल खर्चही कमी असेल, यावर हे तंत्रज्ञान विकसित करताना भर देण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.