भारतातली सगळ्यात बडी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुति सुझुकीनं वर्षाला तब्बल पाच लाख गाड्या निर्यात करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. पुढील वर्षी कंपनी दोन लाख गाड्यांची निर्यात करणार असून नजीकच्या भविष्यातलं लक्ष्य पाच लाख गाड्यांचं आहे. मारुति सुझुकी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी केनीची आयुकावा यांनी सांगितलं की, गुजरातमधला कारखाना पूर्ण क्षमतेनं उत्पादन करू लागल्यानंतर निर्यात वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. भारतामध्ये एकूण 20 लाख गाड्यांचं वार्षिक उत्पादन करण्याचं व त्यातील 25 टक्के म्हणजे पाच लाख गाड्यांच्या निर्यातीचं लक्ष्य मारुतिनं ठेवलं आहे.

“सध्या आमची अपेक्षा आहे की उत्पादनाच्या किमान 10 टक्के निर्यात असावी, त्यामुळे येत्या वर्षात दोन लाख गाड्यांची निर्यात करण्यात येईल. परंतु आदर्शवत स्थिती ती असेल ज्यावेळी उत्पादनाच्या 25 टक्के गाड्या निर्यात होतील आणि तेच आमचं लक्ष्य आहे,” आयुकावा पीटीआयशी बोलताना म्हणाले. मारुति सध्या चिली, इंडोनेशिया, दक्षिण अफ्रिका, उरुग्वे व नेपाळ या देशांमध्ये गाड्या निर्यात करते. युरोप व जपानसारख्या बाजारांमध्येही ठराविक मॉडेल्स निर्यात करण्याच्या दिशेने कंपनी प्रयत्न करत आहे.

उजव्या बाजुच्या ड्रायव्हिंगसह डाव्या बाजुच्या ड्रायव्हिंगच्या गाड्या वापरणाऱ्या देशांसाठी तशा प्रकारच्या गाड्यांचं उत्पादन करण्याची गरज आयुकावा यांनी व्यक्त केली. आयुकावा यांनी सांगितलं की एप्रिल 2017 ते मार्च 18 या कालावधीत मारुतिनं 1,26,074 गाड्या निर्यात केल्या होत्या. तर एप्रिल ते डिसेंबर 2018 या अवधीत 81,000 गाड्या निर्यात झाल्या आहेत. त्यामुळे दोन वर्षांमध्ये दोन लाख गाड्यांच्या व नंतर पाच लाख गाड्यांच्या निर्यातीचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य मारुतिनं ठेवलं आहे.