देशातील वाहन उद्योगावर सध्या ओला-उबर कंपन्यांच्या वाहनांचा वाढत्या वापराचा परिणाम झाला असल्याचे दिसत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले आहे. चेन्नईत पत्रकारांशी संवाद साधताना सीतारमन यांनी, ‘नवी वाहनं खरेदी करण्यापेक्षा ओला-उबरच्या वाहनाचा वापर बरा, अशी लोकांची सध्या मानसिकता झाल्याचे दिसत असल्याने वाहन उद्योगासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत’ असं मत व्यक्त केलं. मात्र अर्थमंत्र्यांच्या या मताला विरोध करणारी भूमिका मारुती सुझुकीने मांडली आहे. ‘ओला-उबरचा वाहन उद्योगावर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र देशातील वाहन उद्योगाचा योग्य अभ्यास केल्यानंतर वाहन उद्योगातील मंदीमागील कारणे समजू शकतील असं मत’ मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री विभाग) शशांक श्रीवास्तव यांनी व्यक्त केले आहे.
‘देशामध्ये चारचाकी गाडी विकत घेण्यामागील मानसिकतेमध्ये बदल झालेला नसून आजही अनेकजण केवळ महत्वकांशा म्हणून कार विकत घेतात,’ असं मत श्रीवास्तव यांनी नोंदवले आहे. ‘देशातील वाहन उद्योग क्षेत्रातील मंदीला ओला-उबर जबाबदार असल्याचे वाटत नाही. कोणत्याही निष्कर्षावर पोहचण्याआधी वाहन उद्योगाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. मागील सहा ते सात वर्षांपासून ओला- उबरसारख्या सेवा अस्तित्वात आल्या आहेत. याच कालावधीमध्ये वाहन क्षेत्राची भरभराट झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. तर मग मागील काही महिन्यांमध्येच असं काय झालं आहे ज्यामुळे वाहनक्षेत्रात मंदी आली आहे? मला नाही वाटत की केवळ ओला-उबरमुळे वाहन क्षेत्रात मंदी आली आहे,’ असं मत श्रीवास्तव यांनी व्यक्त केलं आहे.
आपले म्हणणे मांडताना श्रीवास्तव यांनी अमेरिकेतील वाहन उद्योगाचे उदाहरण दिले आहे. अमेरिकेमध्ये उबर मोठ्याप्रमाणात असूनही तेथील वाहन उद्योग चांगली कामगिरी करत असल्याचं निरिक्षण त्यांनी नोंदवलं. ‘आजही भारतामध्ये पहिल्यांदा कार विकत घेणाऱ्यांची संख्या ४६ टक्के इतकी आहे. आजही अनेकजण महत्वकांशा म्हणून कार विकत घेतात. आठवडाभर ऑफिसला जाण्यासाठी अनेकजण ओला-उबर वापरत असतील. पण विकेण्डला कुटुंबाबरोबर फिरायला जाण्यासाठी आजही अनेकजण कार घेण्याला प्राधान्य देतात,’ असं श्रीवास्तव यांनी सांगितलं.
वाहन क्षेत्रातील मंदीला अनेक गोष्टी कारणीभूत असल्याचे मत श्रीवास्तव यांनी मांडले. रोखता (लिक्विडिटी) कमी असणे, नियामक समस्यांमुळे वाढलेल्या उत्पादनांच्या किंमती, उत्पादनांवरील कर तसेच विमा दरात झालेली वाढ यासारख्या गोष्टींचा वाहन उद्योगावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे, असं श्रीवास्तव यांनी सांगितलं. मागील महिन्यामध्ये वाहन उद्योगाला उभारी देण्यासाठी सरकारने घेतलेले निर्णय हे पुरेसे नसल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले.
मारुती सुझुकीच्या वाहनांची देशांतर्गत विक्री ऑगस्ट महिन्यामध्ये २३.५५ टक्क्यांनी कमी झाली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात २३ लाख ८२ हजार ४३६ वाहने विकली गेली होती. हाच आकडा या वर्षी १८ लाख २१ हजार ४९० इतका आहे. मारुती सुझुकीने नवीन गाड्या बाजारात आणल्या असून सणांच्या पार्श्वभूमीवर कंपनीला काही दिलासादायक निकाल मिळतील अशी अपेक्षा श्रीवास्तव यांनी व्यक्त केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2019 4:37 pm