नवी दिल्ली : रक्षाबंधन, बकरी ईद, ओणमसारख्या वैविध्यपूर्ण सणांद्वारे यंदाच्या हंगामाची सुरुवात करणाऱ्या ऑगस्टमध्ये मात्र आघाडीच्या वाहन कंपन्यांना विक्री घसरणीला सामोरे जावे लागले आहे. मारुती सुझुकीची वाहन विक्री यंदा रोडावली आहे. तर ह्य़ुंदाई मोटर इंडियात किरकोळ वाढ नोंदविली गेली आहे.

केरळमधील ओल्या दुष्काळानेही देशाच्या वाहन क्षेत्रावर चिंता उमटल्याचे दिसून आले आहे. आघाडीच्या दुचाकी कंपन्यांनाही एवघ्या एक अंकी वाहन विक्रीतील वृद्धीवर समाधान मानावे लागले आहे. चलन अस्थिरता तसेच कच्च्या मालाची आयात महाग झाल्याने अनेक कंपन्यांनी त्यांची विविध वाहने गेल्या महिन्यातच महाग केली होती. तसेच सप्टेंबरपासून विम्याबाबत झालेल्या बदलाचाही विपरित परिणाम वाहन विक्रीवर झाला आहे.

गेल्या महिन्यात मारुती सुझुकीची वाहन विक्री ३.४ टक्क्य़ांनी घसरून १,५८,१८९ झाली आहे. तर कंपनीची देशांतर्गत वाहन विक्रीदेखील खाली येताना २.८ टक्क्य़ांनी कमी होत १,४७,७०० नोंदली गेली आहे. कंपनीची निर्यातही १०.४ टक्क्य़ांनी घसरून १०,४८९ वर आली आहे.

कोरिअन बनावटीच्या ह्य़ुंदाई मोटर इंडियाच्या वाहन विक्रीत ३.४ टक्क्य़ांनी घसरण होत ती गेल्या महिन्यात ६१,९१२ झाली आहे. कंपनीची देशांतर्गत विक्री २.८ टक्क्य़ांनी खाली येत ४५,८०१ झाली आहे. निर्यातीत अव्वल असलेल्या या कंपनीची निर्यात २५.८ टक्क्य़ांनी वाढून १६,१११ वर गेली आहे.

जपानी होंडा कार्स इंडियाने यंदा किरकोळ घसरण नोंदविताना ऑगस्टमध्ये १७,०२० वाहन विक्री राखली आहे. देशाबाहेर कंपनीने अवघ्या ६०१ वाहनांची विक्री केली आहे.

महिंद्र अँड महिंद्रची वाहन विक्री १४ टक्क्य़ांनी उंचावत ४८,३२४ वर पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत कंपनीने ४२,२०७ वाहन विक्री नोंदविली होती. देशांतर्गत विक्री १५ टक्क्य़ांनी तर निर्यात १४ टक्क्य़ांनी वाढली आहे. कंपनीच्या प्रवासी वाहनांची विक्री २ टक्क्य़ांनी तर व्यापारी वाहनांची विक्री २५ टक्क्य़ांनी वाढली आहे.

टाटा मोटर्सची वाहन विक्री २७ टक्क्य़ांनी झेपावत ५८,२६२ वर पोहोचली आहे.