टाटा मोटर्सच्या वाहननिर्मितीत ६३ टक्क्य़ांनी घट

नवी दिल्ली : वाहन क्षेत्रात खरेदीदारांकडून नोंदली जाणारी कमी मागणी ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावरही कायम राहिली आहे. देशातील अव्वल मारुती सुझुकीबरोबरच टाटा मोटर्सनेही गेल्या महिन्यात कमी वाहननिर्मिती केली आहे.

देशातील अव्वल मारुती सुझुकीने सलग आठव्या महिन्यात कमी वाहननिर्मिती केली आहे. तर टाटा मोटर्सच्या वाहन निर्मितीत यंदाच्या सप्टेंबरमध्ये तब्बल ६३ टक्के कपात केली आहे.

मारुती सुझुकीची सप्टेंबरमधील वाहननिर्मिती १७.४८ टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कंपनी वाहननिर्मितीत कपात करत आहे. नव खरेदीदारांकडून मागणी नोंदविली जात नसल्याने कंपनीची वाहन विक्रीही कमी झाली आहे.

मारुती सुझुकीने यंदाच्या सप्टेंबरमध्ये एकूण १,३२,१९९ वाहनांची निर्मिती केली. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत ती १,६०,२१९ होती. तर कंपनीच्या प्रवासी वाहनांची निर्मिती गेल्या महिन्यात १,३०,२६४ राहिली आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये ती १,५७,६५९ नोंदली गेली होती. वार्षिक तुलनेत त्यात १७.३७ टक्के घसरण झाली आहे.

लहान तसेच कॉम्पॅक्ट कारची निर्मिती गेल्या महिन्यात जवळपास १५ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर ग्राहकांचा बदलता कल असलेल्या बहुपयोगी वाहनांची निर्मितीदेखील १७ टक्क्यांनी कमी झाली आहे. कंपनीच्या मध्यम गटातील प्रवासी कार यंदा जवळपास निम्म्यावर येऊन ठेपल्या आहेत.

हलक्या, लहान व्यापारी वाहन निर्मितीत काही महिन्यांपूर्वीच शिरकाव करणाऱ्या मारुती सुझुकीच्या सुपर कॅरी वाहनांची निर्मिती सप्टेंबर २०१८ मधील २,५६० वरून १,९३५ वर येऊन ठेपली आहे. मारुती सुझुकीने ऑगस्टमध्ये ३३.९९ टक्के निर्मिती कपात करत १,११,३७० वाहननिर्मिती नोंदविली होती.

टाटा मोटर्सच्या वाहननिर्मिती गेल्या महिन्यात मोठी घसरण होऊन ती ६,९७६ झाली आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये १८,८५५ वाहन निर्मिती झाली होती. टाटा मोटर्सच्या नॅनो या बहुचर्चित वाहनाचे कोणतीही निर्मिती गेल्या नऊ महिन्यांपासून करण्यात आली नाही. कंपनीने फेब्रुवारी २०१९ मध्ये केवळ एक नॅनो कार विकली होती.

महिंद्र अँड महिंद्र, ह्य़ुंदाई, टोयोटा, होंडासह अनेक कंपन्यांनी गेल्या महिन्यात दुहेरी अंकातील वाहन विक्री घसरण नोंदविली आहे. वाहन क्षेत्राला गेल्या अनेक महिन्यांपासून ग्राहकांकडून होणाऱ्या कमी खरेदीचा सामना करावा लागत आहे.