05 March 2021

News Flash

मारुती सुझुकीने दोन दिवसांसाठी थांबवले उत्पादन

वाहन उद्योग क्षेत्राने जुलैमध्येमध्ये १९ वर्षांतील नीचांकी विक्री नोंदविली

विक्रीत होत असलेल्या घसरणीमुळे देशातील वाहन उत्पादक उद्योग संकटात सापडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी कपात, विक्री दालनांची संख्या कमी करणे, उत्पादनाला कात्री लावल्यानंतर आता देशातील वाहन उद्योगांनी प्रकल्पच काही दिवसांसाठी तात्पुरते बंद ठेवण्याचे धोरण अनुसरले आहे. देशातील अग्रगण्य कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकी इंडियाने त्यांचे दोन प्रकल्प दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहन उद्योग क्षेत्राने जुलैमध्येमध्ये १९ वर्षांतील नीचांकी विक्री नोंदविली आहे. चढा कर भार, अनिवार्य विमा तसेच इंजिनासाठी अद्ययावतता यामुळे किमती वाढल्याने मागील सलग नऊ महिन्यात विविध गटांतील वाहन विक्री रोडावली आहे. गेल्या काही महिन्यांपासूनच्या बाजारातील मागणीअभावी वाहन निर्मिती कंपन्यांनी हे पाऊल उचलले आहे. भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकी इंडियाने दोन दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. “हरयाणातील गुरूग्राम आणि मानेसर येथील युनिटमधील दोन दिवस उत्पादन पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. ७ आणि ९ सप्टेंबरला दोन्ही ठिकाणी उत्पादन बंद राहिलं”, असे कंपनीने म्हटले आहे.

यापूर्वी ह्य़ुंदाई इंडिया व फोक्सवॅन वगळता इतर जवळपास सर्वच कंपन्यांनी वाहन निर्मितीतील कपात जाहीर केली आहे. बॉश या वाहनांसाठीच्या सुटे भाग निर्मिती समूहाने महिन्याच्या सुरुवातीलाच तिच्या दोन प्रकल्पांतील निर्मिती १३ दिवसांसाठी बंद असेल, असे जाहीर केले होते. टाटा मोटर्सनेही काही दिवसांपूर्वीच तिच्या पुणेनजीकच्या प्रकल्पात कमी प्रमाणातील वाहन निर्मिती करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी केली.

‘मारुती’तील ३,००० कंत्राटी कामगार बेरोजगार
मारुती सुझुकीने यापूर्वी कंपनीतील ३,००० कंत्राटी कामगारांना नारळ दिला आहे. कंपनीतील तात्पुरत्या स्वरूपातील काही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे करार संपले असून त्यांचे नूतनीकरण करण्यात आले नसल्याचे मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी स्पष्ट केले होते. वाहन क्षेत्रातील मंदीमुळे तात्पुरत्या सेवेतील कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले असून कंपनीतील कायम तत्त्वावरील कर्मचाऱ्यांवर कंपनीच्या निर्णयाचा परिणाम होणार नाही, असे भार्गव यांनी स्पष्ट केले. मागणीप्रमाणे कर्मचारी भरती वा कपातीचे धोरण अनुसरले जाते, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 4:23 pm

Web Title: maruti suzuki to halt production for two days bmh 90
Next Stories
1 चांदीचा भाव ५० हजार रुपयापार; सोनेही ४० हजार रुपयांनजीक
2 कर्जाच्या अरिष्टाने ग्रासलेल्या “आयडीबीआय”ला सरकार व एलआयसीकडून ९,३०० कोटींचे भांडवल
3 गुंतवणूकदारांना २.५५ लाख कोटींचा फटका
Just Now!
X