नातेवाईक, मित्र, सहकाऱ्यांना विमा योजना, वैद्यकीय उपचार साहित्य देण्याकडे कल

वीरेंद्र तळेगावकर, लोकसत्ता

मुंबई : हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत जाणारी करोना साथ आणि टाळेबंदीतून ग्राहक वर्गाची सुटका होत असून या दरम्यान मुकलेल्या अनेक सणांच्या तुलनेत यंदाची दिवाळी पुनश्च हरिओम करण्यासाठी संधी असल्याची भावना उत्सवमूर्तीमध्ये आहे. न भूतो न भविष्यती अशा यंदाच्या प्रसंगी प्रत्यक्ष भेटीगाठी टाळत भेटवस्तूंची परंपरा जपतानाही आरोग्याविषयीची काळजी व प्राधान्य दिसून येत आहे. १० रुपयांचे मास्क ते ५०० रुपयांचे विमा गिफ्ट कार्ड, १,००० रुपयांचे कोविड प्रतिबंधक साहित्याचे किट अशा अनोख्या वस्तू यंदा भेटकर्त्यांकडून परडीत टाकल्या जात आहेत.

एरवीच्या चॉकलेट, काजू-बदाम, पणत्या, कपडे यांच्याऐवजी यंदा भेटवस्तूंच्या परडीत आरोग्य-अर्थ साहित्य-उत्पादनांची गर्दी दिसत आहे. मास्क, सॅनिटायझर आदींबरोबरच रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी- विशेषत: आयुर्वेदिक औषधे, खाद्यपदार्थ देण्याकडेही कल आहे. आरोग्याबरोबरच आर्थिक साक्षरतेलाही यंदाच्या सणांमध्ये प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते. विमा योजना, डिमॅट खाते, विविध बचत योजना व पर्याय यांची माहितीसह त्यातील गुंतवणुकीची नातेवाईकांना प्रत्यक्ष सुरुवात करून देण्याकडे कल आहे.

सनदी लेखापाल तृप्ती राणे यांनी हा कल अधोरेखित करताना सांगितले की, भेटवस्तू देण्यातील कल यंदा काही प्रमाणात बदलला आहे. मात्र आर्थिक साक्षरतेबाबत, आर्थिक स्ववलंबनाविषयीची जाणीव वाढली आहे. तंत्रस्नेही (डिजिटल) माध्यमांमुळे अनेकांनी आर्थिक नियोजन, भविष्यातील आर्थिक तरतूद यासाठी निवृत्तीपूर्वीची तयारी के ल्याचे या कालावधीत दिसून आले.

आर्थिक नियोजनकार वसंत कुलकर्णी म्हणाले की, भारतीय संस्कृतीत एक परंपरा म्हणून सदिच्छेसह भेटवस्तू देण्याचा प्रघात आहे. सणांच्या निमित्ताने भेटवस्तू देणे ही त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा संकेत समजला जातो. भेटवस्तूंच्या यादीत सुकामेवा, आवडीच्या वस्तू दिल्या जात असल्या तरी उपयुक्तता आणि मोल यांचा समतोल साधला जाताना यंदा दिसत आहे.

टाळेबंदी शिथिल झाली असली तरी करोनाची धास्ती कायम असल्याने अनेकांना स्वतच्या सीमित कु टुंबाबरोबरच यंदाची दिवाळी साजरी करणे भाग पडत आहे. बाजारपेठेतही अत्यावश्यक वस्तूंसाठीची खरेदी होत आहे. चैनीच्या वस्तू खरेदीचा मोह यंदा टाळला जात आहे.

वर्ष २०२० च्या मावळतीसमीपाला भेटीगाठीची उणीव यंदा अनोख्या भेटवस्तू देऊन भरून काढण्याचा प्रघात रूढ होत आहे.

यंदाच्या दिवाळीला नातेवाईकांना भेट देता येईल असे विमा गिफ्ट कार्ड आम्ही सादर के ले आहे. प्रिपेड कार्डसारखे असणारे हे कार्ड ५०० आणि १,००० रुपयांच्या पटीत उपलब्ध आहे. १० टक्के  सवलतीत ते खरेदी करता येईल. त्याची वैधता सहा महिने आहे. या कार्डचा उपयोग करून धारकाला विमाछत्र प्राप्त करता येईल.

– राकेश जैन, कार्यकारी संचालक, रिलायन्स जनरल इन्शुरन्स.