सध्या जगभरातच र्मचट नेव्हीसारख्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा जाणवत असून, लोकसंख्येत सध्या सर्वाधिक तरुणांचा भरणा असलेल्या भारतातही सागराला कवेत घेणाऱ्या व्यावसायिक नाविकांची संख्या जगाच्या तुलनेत खूपच कमी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन नौकानयन क्षेत्रातील अग्रेसर संघटना ‘द मॅरिटाइम असोसिएशन ऑफ शिपओनर्स, शिपमॅनेजर्स अॅण्ड एजंट्स’ अर्थात ‘मासा’ने एक विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
जागतिक पातळीवरील सागरी अधिकाऱ्यांमध्ये भारताचा सध्या जवळपास सात टक्के असलेला हिस्सा पुढील काही वर्षांत नऊ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ‘मासा’ने ठेवले असून, यासाठी नौकानयन मंत्रालय आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे तिला साहाय्य लाभणार आहे. साहस-ध्यायी तरुणांनी आकर्षक वेतनमान असलेल्या र्मचट नेव्हीची करिअर म्हणून निवड करावी आणि जागतिक पातळीवरील नौकानयन उद्योगाच्या प्रगतीमध्ये सहभागी व्हावे, असा या मोहिमेमागील उद्देश असल्याचे ‘मासा’चे अध्यक्ष कॅप्टन शिव हळबे यांनी सांगितले. ‘मासा’ने जागतिक धाटणीच्या मॅरिटाइम ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटच्या माध्यमातून दर्जेदार सागरी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने नवी मुंबई आणि चेन्नई येथे ‘मॅरिटाइम ट्रेनिंग अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन (एमटीआरएफ)’ची स्थापना केली आहे (तपशील :  http://www.massamaritimeacademy.org) या क्षेत्राकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी ‘मासा’कडून येत्या महिन्यात आघाडीच्या शहरांमध्ये व्यापक प्रसारमोहीम राबविली जाणार आहे.