एनएसईएलच्या माध्यमातून वायदा बाजारातील घोटाळ्यावरून गाजलेल्या फायनान्शिअल टेक्नॉलॉजीज समूहातील एमसीएक्स (मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज)ला तब्बल दोन वर्षांनंतर पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाला आहे.
डॉएच्च या विदेशी बँकेत १४ हून अधिक वर्ष राहिलेले परांजपे यांनी एमसीएक्सची धुरा सोमवारपासून स्वीकारली. पुढील तीन वर्षांसाठी ते येथे असतील. एमसीएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद हे गेल्या दोन वर्षांपासून रिक्तच होते. विद्यमान सहव्यवस्थापकीय संचालक पी. के. सिंघल हे तूर्त या पदाचा तात्पुरता कार्यभार पाहत होते. सिंघल यांच्याकडे आता कंपनीचे अध्यक्षपद व पूर्णवेळ संचालकपद आले आहे. वर्षभरापूर्वी एमसीएक्सच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या सिंघल यांना वायदा बाजार आयोगाने आक्षेप घेतला होता.