सहा महिन्यात आणखी उत्पादनांवर नव्या मुख्याधिकाऱ्यांचा भर

मुख्य कंपनीतील भागीदारी हिस्सा बदलानंतर देशातील आघाडीचा वायदे बाजार मंच असलेल्या एमसीएक्सने नजीकच्या कालावधीत कृषी क्षेत्रातील नव्या चार ते सहा उत्पादनांच्या वायदा व्यवहार उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले आहे.
कंपनीचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मृगांक परांपजे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी प्रथमच संवाद साधताना या नव्या उत्पादनाबाबत भांडवली बाजार नियामक सेबीबरोबर कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आल्याचे स्पष्ट केले. याबाबतची प्रत्यक्ष प्रक्रिया येत्या सहा महिन्यात सुरू होईल, असेही ते म्हणाले.
परांजपे यांनी नजीकच्या भविष्यात एमसीएक्स बाजारमंचासाठी त्यांचा दृष्टिकोन आणि योजलेल्या प्राधान्यक्रमांची माहिती यावेळी दिली. विविध विषयांसंदर्भात वायदे बाजार मंचाच्यचा भूमिकेवर याप्रसंगी विस्ताराने भाष्य केले.
जुल २०१३ पासून वायदे बाजार उलाढाल कर (सीटीटी) लागू झाल्याने, एनएसईएलमधील पुढे आलेला घोटाळा, बाजार मंचाच्या गत कारभाराचे न्यायवैद्यक लेखापरिक्षणाच्या पाश्र्वभूमीवर अनेक वरिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कंपनीतून निर्गमन वगरे आव्हानांना मंच समर्थपणे मात देऊन सशक्त उभा असल्याचे त्यांनी यावेली नमूद केले.
बाजार मंचातील यापूर्वीच्या घडामोडींनंतर नियुक्त ‘पीडब्ल्यूसी’चा अहवाल आणि त्यातून सुचविलेल्या उपायांची अंमलबजावणी केली गेली असून, आता पूर्ण तयारीनिशी पुढच्या वाढीच्या टप्प्यावर मार्गक्रमणा सुरू झाली आहे, असे ते यावेळी विश्वासाने म्हणाले.
वायदा वस्तूंच्या किंमतीतील लक्षणीय घसरणीच्या परिणामी मंचाच्या एकंदर उलाढालीचे प्रमाण तीव्र स्वरूपात रोडावले तरी सरासरी दैनंदिन उलाढालीचे प्रमाण त्यानंतर बऱ्यापकी स्थिरावले असून नोव्हेंबर २०१३ मधील नीचांक स्तरापासून ते मे २०१६ मध्ये जवळपास ६१ टक्क्यांनी उंचावत आले आहे, अशी त्यांनी माहिती दिली. २०१४-१५ मधील ८४.१ टक्के पातळीवर असलेला कंपनीचा बाजार हिस्साही वर्ष २०१५-१६ मध्ये ८४.३ टक्के असा वाढल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.