देशाच्या आर्थिक विकासात सूक्ष्म, लघू व मध्यम (एसएमई) उद्योगांचे योगदान आणि जगाच्या तुलनेत स्पर्धात्मक ठरण्यासाठी हे उद्योग घेऊ पाहत असलेली भरारी या विषयांवर सांगोपांग चर्चा करणारी परिषद ‘महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ’ (एमईडीसी)ने येत्या १० सप्टेंबर २०१४ रोजी आयोजित केली आहे. वांद्रे (प.) येथील आयईएस संकुलाच्या माणिक सभागृहात (लीलावती रुग्णालयासमोर) होत असलेल्या या परिषदेचे उद्घाटन एसएमई विभागाचे केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांच्या हस्ते होणार आहे.
एसएमई उद्योगांना वित्तपुरवठय़ासाठी असलेल्या बँकांच्या विविध योजनांची माहिती या क्षेत्रात सुरू असलेल्या विविध सुधारणा व धोरणांमधील बदल यावरही परिषदेत भर देण्यात येईल. एमआयडीसी, भारत सरकारचा एसएमई विभाग, एसएमई डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट मुंबई, केंद्र व राज्यातील खादी व ग्रामोद्योग मंडळ, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ यांच्या मुख्याधिकाऱ्यांसह एक्झिम बँक, आयडीबीआय बँक यांचे अधिकारी, उद्योगक्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचे मान्यवर, अर्थतज्ज्ञ तसेच  अन्य तज्ज्ञांचा परिषदेत वक्ते म्हणून सहभाग असेल. या परिषदेसाठी राज्यातील छोटय़ा उद्योगांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन एनईडीसीच्या उपाध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी केले आहे.