हॉस्पिटल्स, वैद्यकीय पायाभूत सुविधा, वैद्यकीय उपकरणे, चिकित्सा उपकरणे, आऊटसोर्सिंग, टेलीमेडिसीन, आरोग्य विमा आणि अन्य सामग्री असे भारताचा आरोग्यनिगा उद्योग रुपयाचे अवमूल्यन आणि अनिश्चित अर्थस्थितीतही नजीकच्या भविष्यात चांगले प्रदर्शन करेल, अशी या उद्योगाची ठाम धारणा आहे. वेगाने विस्तारणाऱ्या वैद्यक-उपकरण उद्योगाचा सामायिक मंच ‘मेडटेक इंडिया २०१३’मधून याच धर्तीवर आगामी विकासपथाची आखणी करणारा चर्चा-विमर्श अपेक्षित आहे.
भारतीय आरोग्यनिगा उद्योग २०१२ मधील ७९ अब्ज अमेरिकी डॉलरवरून २०१७ पर्यंत १६० अब्ज डॉलरवर जाणे अपेक्षित आहे. वैद्यकीय उपकरण उद्योगाचा यात मोठा वाटा असून, हॉस्पिटल्सची वाढती संख्या आणि आरोग्य सुविधांची वाढती गरज नवनवीन साधने आणि उपकरणांची गरज निर्माण करत आहे. सध्या या बाजारात महानगरे आणि बडय़ा शहरांचे योगदान ५० टक्के असून छोटय़ा शहरांचे योगदान वाढत जाणे अपेक्षित आहे. ३ आणि ४ ऑक्टोबरला अंधेरीस्थित हॉटेल द ललितमध्ये होणाऱ्या मेडटेक इंडिया परिषदेत सर्व सहभागी उपलब्ध संधींचा ऊहापोह करतील, असे झिमर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संजय बॅनर्जी यांनी सांगितले.