वातावणातील आमुलाग्र बदलामुळे वाढणाऱ्या साथीच्या आजाराचा बिमोड करण्यासाठी औषध कंपन्याही सरसावल्या असून गंभीर आजारासाठी अनेक कंपन्यांनी त्यांची नवी औषधेही या दरम्यान सादर केली आहेत.

ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेल्या हिवाळी तसेच पावसाळी वातावरणामुळे विविध आजार बळावलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये अनेकांना जीवालाही मुकावे लागले आहे. एकटय़ा स्वाईन फ्ल्यूमुळे बळी पडलेल्यांची संख्या ८०० हून अधिक आहे. तर बाधितांची संख्या १४ हजारांहून मोठी असण्याची भीती आहे. होमिओपॅथी क्षेत्रातील आघाडीच्या डॉ. बत्राज्ने स्वाईन फ्ल्यूसाठी मोफत औषध वाटपाचे जाहीर केले आहे. कंपनीची स्वाईप फ्ल्यू प्रतिबंधक औषधे कंपनीच्या देशभरातील १८४ दालनांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. येत्या १५ मार्चपर्यंत दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान प्रतिबंधक डोस दिला जाणार आहे. ‘आयुष’ अंतर्गत ‘द सेन्ट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी’ने यासाठी ‘आस्रेनिकाम अल्बम ३०सी’ या होमिओपॅथी उपचाराची शिफारस केल्याचे याबाबत डॉ बत्राज्चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. मुकेश बत्रा यांनी म्हटले आहे.
डेंग्यूग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गोवन फार्मा या गोव्यास्थित आयुर्वेदिक कंपनीने याबाबतच्या उपचारासाठी सिरपच्या रुपात ‘डेनपॅप’ हे औषध अल्पावधीतच बाजारात आणले आहे. सर्वाधिक डेंग्यू रुग्णांचे राज्य असलेल्या महाराष्ट्रासाठी प्रथम ते उपलब्ध करून देण्यात आले आहे. या औषधावर गेल्या काही कालावधीत डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अधिक संशोधन केले गेल्याचा दावा यानिमित्ताने करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, भारतात दरवर्षी सरासरी २० हजारांहून अधिक रुग्ण डेंग्यूग्रस्त आढळतात. एकाच वर्षांत मुंबईत डेंग्युमुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती गोवन फार्माच्या व्यवस्थापकीय संचालक मारिया यांनी दिली.