पतधोरण समितीच्या बैठकीच्या माध्यमातून व्याजदर बदलाबाबतच्या निर्णयासाठीची रिझव्‍‌र्ह बँकेची बैठक मंगळवारपासून सुरू होत आहे. तीन दिवस ही बैठक चालणार असून व्याजदराबाबतचा बदल येत्या गुरुवारी स्पष्ट होणार आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर व व्याजदर निश्चितीसाठी नियुक्त पतधोरण समितीचे अध्यक्ष शक्तिकांत दास हे या बैठकीचे नेतृत्व करणार आहेत. याशिवाय समितीतील सदस्यांचाही बैठकीत समावेश आहे.

यंदाच्या बैठकीत व्याजदर कपातीची अटकळ मानली जात आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचा प्रवास गेल्या सहा वर्षांच्या तळात पोहोचल्यानंतर ही व्याजदर कपात अपेक्षित मानली जात आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने यंदाही रेपो आदी प्रमुख दर कमी केल्यास यंदाची ती सलग सहावी कर्ज स्वस्ताई ठरेल. यापूर्वी सलग पाच वेळा व्याजदर कपात करत मध्यवर्ती बँकेने रेपो दर ५ टक्क्य़ांनजीक आणून ठेवले आहेत.

देशातील महागाईचीही वाढती चिंता अर्थव्यवस्थेवर कायम आहे. त्यातच गेल्या महिन्यातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी ५० अंशांच्या काठावरच राहिल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

दरम्यान, देशातील खासगी क्षेत्रातील निर्मिती क्षेत्रात सण-समारंभाच्या महिन्यात किरकोळ वाढ नोंदली गेली आहे. हा निर्देशांक यंदाच्या नोव्हेंबरमध्ये समाधानकारक ५० अंशांच्या पुढे काही प्रमाणात सरकला आहे. आयएचएस मार्किट इंडिया निर्मिती निर्देशांक गेल्या महिन्यात ५१.२ अंश नोंदला आहे.