पथकर (टोल) व्यवस्थापनातील अग्रेसर कंपनी एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि.ने मंगळवारपासून सुरू झालेल्या प्रारंभिक भागविक्रीच्या माध्यमातून भांडवली बाजारात प्रवेश प्रस्तावित केला आहे. कंपनीच्या प्रत्येकी १० रु. दर्शनी मूल्याच्या समभागांची प्रत्येकी ६३ ते ६५ रुपये किंमत पट्टय़ादरम्यान येत्या गुरुवापर्यंत विक्री सुरू राहणार असून, कंपनीने यातून ३२४ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे. दत्तात्रय म्हैसकर, जयंत म्हैसकर आणि त्यांच्या आयडियल टोल अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कडून प्रवर्तित एमईपीकडून मार्च २०१५ अखेर विविध १० राज्यांमध्ये १८ टोल वसुली व्यवस्थापनाचे प्रकल्प चालविले जात आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य रस्ते व परिवहन मंडळांनी हे प्रकल्प कंपनीला बहाल केले आहेत.
कंपनीच्या आर्थिक ताळेबंदावर अद्याप नफा दिसलेला नसल्याने भागविक्रीतील केवळ १० टक्के हिस्सा हा व्यक्तिगत छोटय़ा गुंतवणूकदारांच्या सहभागासाठी खुला असून, ७५ टक्के हिस्सा हा पात्र संस्थागत गुंतवणूकदारांसाठी असेल. आयडीएफसी सिक्युरिटीज, इंगा कॅपिटल आणि आयडीबीआय कॅपिटल मार्केट सव्‍‌र्हिसेस या कंपन्यांकडून भागविक्रीचे व्यवस्थापन पाहिले जात आहे. कंपनीकडून उभारल्या जाणाऱ्या ३२४ कोटींपैकी २६२ कोटी रुपयांचा विनियोग हा कर्जाच्या परतफेडीसाठी केला जाणार आहे.