मर्सिडीजच्या भारतातील बाजारपेठेवर मंदीचा परिणाम झाला नसून सहा महिन्यांमध्ये मर्सिडीजच्या गाडय़ांच्या विक्रीमध्ये ६० टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे मर्सिडीज बेंझचे व्यवस्थापकीय संचालक एबहर्ड कर्न यांनी सांगितले. मर्सिडीजच्या चाकणमध्ये तयार केलेल्या ई-क्लासच्या नव्या मॉडेलचे अनावरण गुरुवारी करण्यात आले.
ई-क्लास प्रकारातील डिझेल २५० सिडीआय, पेट्रोल २०० सीजीआय या दोन नव्या गाडय़ा मर्सिडीज बाजारात आणत आहे. या गाडय़ांमध्ये यापूर्वी बाजारात दाखल करण्यात आलेल्या ई-क्लास गाडय़ांच्या तुलनेमध्ये २००० नवे भाग आहेत. इन्टेलिजन्ट असिस्टन्स सिस्टीम हे नव्या ई-क्लासचे वैशिष्टय़ आहे. इको स्टार्ट फंक्शन, कॉर्नरिंग फंक्शन, रिव्हर्सिग कॅमेरा, अटेन्शन असिस्ट, इन्फेटेन्मेंट सिस्टिम, टायरमधील दाब कमी झाल्याचा इशारा देणारी सिस्टीम अशा सुविधा या नव्या गाडीमध्ये आहेत. नव्या ई-क्लासमध्ये सीजीआयची इंधन कार्यक्षमता ८ टक्क्य़ांनी वाढवून १३.८ किमी प्रतिलीटर एवढी करण्यात आली आहे. ई २५० सीडीआयची (डिझेल) प्रारंभिक किंमत ४३ लाख ६५ हजार रुपये (एक्स-शोरूम पुणे) आहे. ई २०० सीजीआय (पेट्रोल) प्रारंभिक किंमत ४० लाख ७३ हजार रुपये (एक्स-शोरूम पुणे) आहे. ई २५० सीडीआय (डिझेल) च्या मर्यादित लाँच आवृतीची किंमत ४८ लाख ९८ हजार रुपये (एक्स-शोरूम पुणे) आहे.
मर्सिडीजच्या ई-क्लासच्या आतापर्यंत २३ हजार गाडय़ांची भारतात विक्री झाली आहे. मंदीच्या काळातही भारताता मर्सिडीजच्या गाडय़ा आपले स्थान टिकवून आहेत, असे कर्न यांनी या वेळी सांगितले. मेट्रो शहरांबरोबरच देशातील २ टायर शहरांमध्येही या गाडय़ांची मागणी वाढत असून या वर्षांत २ टायर शहरांमध्ये ६ शोरूम नव्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कर्न यांनी दिली.
जेसीबी इंडियातर्फे
‘जेएस २०५’ एक्स्कॅव्हेटर
प्रतिनिधी, पुणे
‘जेसीबी इंडिया लिमिटेड’ या कंपनीतर्फे भारतीय बाजारपेठेसाठी ‘जेएस २०५ एलसी ट्रॅक्ड एक्स्कॅव्हेटर’ हे बांधकाम उपकरण गुरुवारी सादर केले. खोदाई, खाणकाम आणि रस्ते बांधकामासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे. हे उपकरण कमी इंधन वापरत असल्याने त्याद्वारे वर्षांला १.३ लाख रुपयांच्या इंधनांची बचत होणार असल्याचे कंपनीतर्फे या वेळी सांगण्यात आले.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी विपिन सोंधी, कंपनीच्या विपणन विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष अमित गोसेन या वेळी उपस्थित होते.
‘जेएस २०५’ या एक्स्कॅव्हेटरची ग्रॉस इंजिन पॉवर १०६ किलोव्ॉट असून बकेट क्षमता ०.८ ते १.०२ घनमीटर इतकी आहे. हे उपकरण चालवताना ते ‘पॉवर’ आणि ‘इकॉनॉमी’ अशा दोन मोड्सवर चालवता येणार आहे.
इंधन बचतीसाठी उपकरणात ‘लोड सेन्सिंग हायड्रॉलिक सिस्टिम’ ही यंत्रणा वापरण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे दर वर्षांला १.३ लाख रुपयांची इंधन बचत होऊ शकणार आहे. या उपकरणाच्या साहाय्याने कठीण खडकांमधील खोदाईकामही वेगाने करता येणार असून उपकरणाचे हायड्रॉलिक ऑइल पाच हजार तासांपर्यंत चालणार असल्यामुळे देखभालीचा खर्च कमी होणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.
विपिन सोंधी म्हणाले, ‘‘देशातील बाजारपेठेत नवीन बांधकाम उपकरणे आणण्याबरोबरच उपकरणांचे सुटे भाग आणि देखभाल- दुरूस्ती सेवा या क्षेत्रांत विस्तार करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. जेसीबीच्या जागतिक बाजारपेठेत ‘जेसीबी इंडिया’चा तीस टक्के वाटा आहे. गेल्या वर्षी देशातून एक हजार बांधकाम उपकरणांची निर्यात केली गेली.’’