विदेशी दलाली पेढीचा अहवालाद्वारे निष्कर्ष 

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील वेगवेगळ्या १० बँकांना चार बँकांमध्ये सामावणारा ‘एकत्रीकरण कार्यक्रम’ हा सरकारला अपेक्षित बँकांच्या कर्ज वितरण क्षमता आणि नफाक्षमतेत वाढीचा परिणाम साधणे अवघड आहे, असे प्रतिपादन करणारा अहवाल पुढे आला आहे.

जागतिक स्तरावर कार्यरत स्विस दलाली पेढी क्रेडिट सुईसने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या या अहवालानुसार, ‘पुनर्रचनेसंबंधाने लवचीकता खूपच मर्यादित असल्याने, एकत्रीकरणातून खर्चात अर्थपूर्ण कपातीची आणि पर्यायाने नफाक्षमतेत वाढीचा संभव दिसून येत नाही.’ या एकत्रीकरणामुळे रोकडसुलभतेच्या मोठय़ा समस्येचा सामना करीत असलेल्या बँकेतर वित्तीय कंपन्यांना वित्तपुरवठय़ाचा ओघ खुला करण्याच्या दृष्टीने कोणताही परिणाम साधण्याची शक्यता नसल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आव्हान अनुत्तरीतच राहणार आहे.

जरी एकत्र केल्या जाणाऱ्या बँकांचे आकारमान आणि कार्यचालनाचा आवाका वाढणार असला तरी बँकांची नफ्याची कामगिरी कमकुवत राहण्याची शक्यता आहे. परिणामी या बँकांचे भांडवली साहाय्यासाठी सरकारी मदतीवरील मदारही कायम राहील, असा या संस्थेचा कयास आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील वेगवेगळ्या १० बँकांचे चार बँकांमध्ये एकत्रीकरण करणारा ‘महा-विलय कार्यक्रम’ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. या एकत्रीकरण मोहिमेमुळे २०१७ साली सार्वजनिक क्षेत्रात असलेल्या २७ बँकांची संख्या आता केवळ १२ इतकी सीमित होणार आहे. अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे, पंजाब नॅशनल बँक ही ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स व युनायटेड बँक ऑफ इंडियावर ताबा मिळवेल, कॅनरा बँकेत सिंडिकेट बँकेचे विलीनीकरण, युनियन बँक ऑफ इंडियाकडून आंध्र बँक व कॉर्पोरेशन या बँका सामावल्या जातील, तर इंडियन बँकेकडून अलाहाबाद बँक अधिग्रहित केली जाणार आहे.

यापूर्वी स्टेट बँक समूह आणि बँक ऑफ बडोदामधील देना व विजया बँकेचे विलीनीकरण पूर्ण झाले आहे. या एकत्रीकरणातून पुढे आलेला अनुभव पाहता, दोन भिन्न कार्यसंस्कृती, कार्य तंत्रज्ञानात वाढलेल्या बँकांच्या कारभाराचे एकात्मीकरणावर सर्व भर दिला गेल्याने संयुक्त बँकेचा वृद्धिंगत व्यवसाय प्रभावित होतो, असे आढळून आले आहे, असे क्रेडिट सुईसचे अहवालातील निरीक्षण आहे. संयुक्त बँकेला नियामकांद्वारे निर्धारित ८ टक्क्यांची भांडवली पर्याप्ततेचे प्रमाण गाठता येईल, हाच फक्त एकत्रीकरणाचा विधायक परिणाम दिसून येतो, अशी पुस्तीही तिने जोडली आहे.

बँक समभागांना दणका 

प्रस्तावित १० बँकांच्या एकत्रीकरणात सुकाणू बँक म्हणून भूमिका असलेल्या चार बँकांचे समभाग मंगळवारच्या  विक्रीचा दणका बसून, जबर आपटले..

 

* इंडियन बँक               रु.१७६.५५      -११.६८%

* कॅनरा बँक                 रु.१९७.००      -१०.७०%

* युनियन बँक              रु.५३.६०         -८.९२%

* पंजाब नॅशनल बँक    रु.५९.४०         -८.४७%