‘इक्विटी’ योजनांचा दबदबा कायम; रोखे योजनातील गुंतवणुकीत घसरण

सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात प्रामुख्याने संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातून ३१,१९६ कोटी रुपये काढून घेतल्याने म्युच्युअल फंडांच्या एकूण गंगाजळीत ऑक्टोबरच्या १३.२४ लाख कोटी रुपयांच्या नोव्हेंबर महिन्यात २ टक्क्यांनी घट होऊन ती १२.९५ लाख कोटी रुपयांवर घसरल्याचे आढळले आहे. म्युच्युअल फंडांची शिखर संस्था असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने नोव्हेंबर महिन्यांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. ऑक्टोबर महिन्यात देशातील ४४ म्युच्युअल फंडांची एकत्रित मालमत्तेत आधीच्या सप्टेंबरच्या तुलनेत १.३१ लाख कोटी रुपयांची वाढ झाली होती.
नोव्हेंबर महिन्यात लिक्विड फंडातून ३१,००० कोटी गुंतवणूकदारांनी काढून घेण्याच्या जोडीला बाजाराच्या प्रमुख निर्देशांकातील घट म्युच्युअल फंडांची मालमत्ता कमी होण्यास कारण ठरली. बीएसई सेन्सेक्सच्या पातळीत ऑक्टोबरच्या तुलनेत १.८८ टक्क्य़ांची घट झाली आहे. अन्य उद्योगवार क्षेत्रीय निर्देशांकात वाहन, तेल व वायू, ग्राहकोपयोगी वस्तू हे निर्देशांक वधारले तर क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक ९.७८ टक्केघट आरोग्यनिगा निर्देशांकात दिसून आली. या घसरणीला आरोग्यनिगा निर्देशांकातील प्रबळ घटक असलेल्या डॉ. रेड्डीजला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाची औषध निर्मिती प्रक्रियेत आढळलेल्या त्रुटीबाबत ताकीत देणारी सूचना मिळाल्याने या कंपनीच्या समभागाची बाजारातील १५ टक्के घसरण कारणीभूत ठरली. भांडवली वस्तू व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या निर्देशांकात नोव्हेंबर महिन्यात वाढ आढळली. नोव्हेंबर महिन्यात मिडकॅप निर्देशांकात ०.२४ टक्के तर स्मॉलकॅप निर्देशांकात २.८८ टक्के वाढ दिसून आली आहे.
संस्थात्मक गुंतवणूकदार व प्रामुख्याने ताळेबंदात मोठी रोकड बाळगणाऱ्या कंपन्या आपला अतिरिक्त निधी म्युच्युअल फंडांच्या लिक्विड फंडात अल्प मुदतीसाठी गुंतवितात. या प्रकारचा पसा म्हणजे तब्बल ४२,०५९ कोटी रुपये नोव्हेंबर महिन्यात प्रमाणात म्युच्युअल फंडातून काढून घेतला गेल्याने रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेत घट झाली आहे. ‘गोल्ड ईटीएफ’ प्रकारच्या फंडातून या कालावधीत ४० कोटी रुपये काढून घेण्यात आले.
भारतीय म्युच्युअल फंडांच्या इतिहासात प्रथमच ३० ऑक्टोबर २०१५ रोजी समभागसंलग्न अर्थात इक्विटी फंडांतील गुंतवणुकीने ४ लाख कोटींचा टप्पा पार केला. २०१३ नंतर सोने व स्थावर मालमत्तेच्या तुलनेत समभाग गुंतवणुकीतून मिळत असलेला सकारात्मक परतावा लक्षात घेऊन केवळ उच्च धनसंपदा बाळगणारेच नव्हे तर सामान्य गुंतवणूकदारांचा कल इक्विटी फंडांच्या गुंतवणुकीकडे वळल्याचे दिसत आहे. नोव्हेंबर महिना धरून गेले सलग १९ महिने समभागसंलग्न म्युच्युअल फंडांत विक्रीपेक्षा खरेदी अधिक होत आली आहे. सर्व म्युच्युअल फंडांच्या गंगाजळीत दरमहा ‘एसआयपी’द्वारे २,५०० कोटींच्या निधीची भर पडत आहे. सेबीच्या आकडेवारीनुसार चालू वर्षांच्या ११ महिन्यांच्या कालावधीत देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी परकीय अर्थसंस्थांपेक्षा समभागांमध्ये अधिक गुंतवणूक केली असून. परकीय अर्थसंस्थांनी या वर्षी समभाग गुंतवणुकीपेक्षा अधिक गुंतवणूक भारतीय रोख्यांत केली आहे.

म्युच्युअल फंडांच्या समभागसंलग्न (इक्विटी) गंगाजळीला भरते..

कालावधी गंगाजळी एकूण गंगाजळीत%
नोव्हेंबर २०१५ ४०२६७१ ३१
नोव्हेंबर २०१४ ३१४६८४ २८
नोव्हेंबर २०१३ १७५१२८ २०
नोव्हेंबर २०१२ १९०११३ २४
नोव्हेंबर २०११ १७००३७ २५