X

संलग्न १२ म्युच्युअल फंड घराण्यांच्या गुंतवणूकदारांना फटका अपरिहार्य!

रोख्यांचे पतमानांकन घटल्याने म्युच्युअल फंडांनाही त्यांच्या  पोर्टफोलिओत अनुरूप फेरबदल करावा लागतो. त

‘आयएलएफएस’ पतदर्जा-घट

मुंबई : इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस अर्थात ‘आयएलअ‍ॅण्ड एफएस’ समूहातील विविध उपकंपन्यांच्या रोखे योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या रोखेसंलग्न (डेट) म्युच्युअल फंडांनी आणि त्यातील गुंतवणूकदारांनी चिंता करावी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पतमानांकन संस्था – ‘इक्रा’ने आयएल अ‍ॅण्ड एफएस समूहाशी संलग्न कर्जरोखे आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाचे मानांकन नऊ पायऱ्यांनी म्हणजे ‘एए+’ वरून गुंतवणुकीस अयोग्य स्थितीवर आणून ठेवल्याचा फटका म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना बसणे अपरिहार्य दिसून येतो.

घसरत्या रोकड तरलतेतून कंपनीची दायित्वानुरूप कर्जफेडीची क्षमता कमी होणे, त्या बरोबरीनेच आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात प्रवर्तकांच्या असमर्थतेची भर पडल्याने ‘आयएलएफएस’चे पतमानांकन ढेपाळण्यास कारणीभूत ठरले आहे. तथापि, गुंतवणूकदार वर्गाच्या दृष्टीने त्याचे परिणाम पाहता, रोख्यांची पतधारणा घटणे संबंध वित्तीय सेवा क्षेत्राच्या दृष्टीने धक्कादायकच आहे, असे विश्लेषकांचे मत आहे.

रोख्यांचे पतमानांकन घटल्याने म्युच्युअल फंडांनाही त्यांच्या  पोर्टफोलिओत अनुरूप फेरबदल करावा लागतो. तथापि, गुंतलेला निधी परत मिळेलच याची खात्री नसल्याने या योजनेतील गुंतवणूकदारांची कोंडी होण्याचे कटू प्रसंग अलीकडच्या वर्षांत अ‍ॅम्टेक ऑटो, जिंदल स्टील अ‍ॅण्ड पॉवर आणि बल्लारपूर इंडस्ट्रीजसारख्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांबाबतही अनुभवास आले आहेत. ‘व्हॅल्यू रिसर्च’च्या तपशिलानुसार, ३१ ऑगस्टअखेर डीएसपी, एलआयसी म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ या फंड घराण्यांची ‘आयएलएफएस’शी संलग्न रोख्यांमध्ये प्रत्येकी ६०० कोटींहून अधिक गुंतवणूक आहे.

विविध १२ म्युच्युअल फंड घराण्यांचे आणि त्यांच्या ३३ डेट आणि हायब्रीड योजनांचे आयएल अ‍ॅण्ड एफएस समूहाशी संलग्न रोख्यांमध्ये सुमारे २८०० कोटी रुपये गुंतलेले आहेत, असे ‘व्हॅल्यू रिसर्च’ने ३१ ऑगस्ट २०१८ रोजी संकलित माहितीच्या आधारे स्पष्ट केले आहे. शिवाय या समूहाने बँकांची ६०,००० कोटींची कर्जे थकविली आहेत.