‘डीएमआयसी’कडे जागेची मागणी
औरंगाबाद : दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ातील (डीएमआयसी) औरंगाबाद औद्योगिक शहर विकासासाठी शेंद्रा क्षेत्रातील १,१०० हेक्टर क्षेत्रफळावर सध्या ५२ कंपन्यांनी भूखंड खरेदी केले असले, तरी नियोजित आराखडय़ानुसार शहर विकासासाठी अद्याप फार कंपन्या पुढे आल्याचे चित्र नाही. अशातच या परिसरात गृहनिर्माणासाठी ‘म्हाडा’ने जागेची मागणी केली आहे.
गृहनिर्माणासाठी म्हाडाला येथे जागा द्यायची की नाही अथवा किती द्यायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तथापि या प्रस्तावित औद्योगिक शहर विकासाला गती देण्यासाठी गृहनिर्माण विकासासाठी आलेला हा पहिलाच प्रस्ताव आहे.
येथे येणाऱ्या कंपन्यांनी त्यांची प्रशासकीय कार्यालये सुरू करावीत म्हणून बांधण्यात आलेल्या २५ हजार चौरस मीटरच्या ‘ऑरिक हॉल’ या अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन होऊन तीन महिने झाले तरी अद्याप या इमारतीमध्ये कमालीची शांतता जाणवते. या पाच मजली इमारतीमधील तीन मजले भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत काही बँकांनी येथे शाखा कार्यालये सुरू करण्यासाठी चौकशी केली असल्याचे डीएमआयसीचे सहव्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील यांनी सांगितले.
दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ातील औरंगाबाद औद्योगिक शहर (ऑरिक) उभे करण्यासाठी संपादित केलेल्या दहा हजार हेक्टरपैकी शेंद्रा परिसरातील २,१०० हेक्टर क्षेत्रावर नवे औद्योगिक शहर वसविले जाणार आहे. त्यातील १,१०० हेक्टरवर उद्योग उभे राहतील, असे अपेक्षित आहे. संपादित केलेल्या जागेपैकी आतापर्यंत ५२ कंपन्यांनी भूखंड विकत घेतले आहेत. त्यात ह्य़ोसंग नावाच्या कंपनीने आता उत्पादन घेण्यासही सुरुवात केली आहे. फूजी सिल्व्हरटेक या कंपनीसह अन्य काही कंपन्यांनी भूखंडावर बांधकामास सुरुवात केली आहे. त्यामुळे औद्योगिक शहरातील उद्योगाला चालना देण्यात यश येत असल्याचा दावा डीएमआयसीचे अधिकारी करतात. ही प्रक्रिया सुरू असतानाच शहर विकासासाठी आवश्यक शाळा, रुग्णालये उभी करण्याचीही प्रक्रिया हाती घेतली जात आहे. काही नामांकित शैक्षणिक संस्था आणि रुग्णालय प्रशासनाने जागा विकत घेण्यासाठी भूखंड मागणी केली आहे. येत्या तीन वर्षांत हे औद्योगिक शहर विकसित होईल, असे डीएमआयसीच्या अधिकाऱ्यांना वाटते आहे.
गेल्या काही दिवसांत रस्ते, पाण्याची स्वतंत्र सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जायकवाडीहून स्वतंत्र जलवाहिनीमार्फत प्रत्येक भूखंडापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून ऑप्टिकल फायबर जाळ्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. औद्योगिक वापरातून बाहेर टाकले जाणारे सांडपाणी पुन्हा शुद्ध करण्याचा प्रकल्पही कार्यान्वित करण्यात आला असून, शहर विकासासाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा आता देण्यात आल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 21, 2019 3:42 am