नोकिया ही नाममुद्रा झटकलेला मायक्रोसॉफ्टचा पहिला ल्युमिआ मोबाइल फोन भारतातही उपलब्ध झाला आहे. ल्युमिया ५३५ हा १० हजार रुपयांच्या आतील स्मार्टफोन येत्या शुक्रवारपासून येथील दालनांमध्ये खरेदी करता येणार असल्याची घोषणा अमेरिकेच्या मायक्रोसॉफ्टची उप कंपनी असलेल्या नोकिया इंडिया सेल्स कंपनीचे विपणन संचालक रघुवेश सरुप यांनी बुधवारी मुंबईत केली.
विण्डोज ८.१ व्यासपीठावरील हा फोन ९,१९९ रुपयांना असेल. ५ इंच स्क्रीन आणि समोर ५ मेगा पिक्सल कॅमेरा यात देण्यात आला आहे. तिची अंतर्गत साठवण क्षमता ८ जीबी असून ती एसडी कार्डच्या साहाय्याने १२८ जीबीपर्यंत विस्तारित करता येऊ शकते. कंपनीने हा फोन व्होडाफोनच्या सेवेसह दोन महिन्यांच्या ५०० एमबी डाटा इंटरनेटद्वारे देऊ केला आहे.
मायक्रोसॉफ्टने यंदाच्या फेब्रुवारीमध्ये नोकिया ही फिनलँडची कंपनी ७.२ अब्ज डॉलरना खरेदी केली. यानंतर नोकिया ही नाममुद्रा कंपनी आपल्या नव्या स्मार्टफोनसाठी वापरणार नाही, अशी घोषणा करण्यात आली होती.