महाविद्यालयातील संगणकांच्या कमतरतेमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला आपले काम पूर्ण करण्यासाठी संगणक उपलब्ध होतोच असे नाही. परंतु आता आपल्या रोजच्या ‘असाईनमेंट्स’ आणि ‘प्रेझेंटेशन्स’ विद्यार्थी मोबाईल फोनवरही करू शकणार आहेत.
वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट अशा सुविधा विंडोज फोनसह अँड्रॉइड आणि आयफोनवरूनही वापरणे शक्य झाले आहे. मायक्रोसॉफ्टतर्फे खास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘ऑफिस ३६५ युनिव्हर्सिटी’ हा अ‍ॅप्लिकेशन संच बाजारात आणला. मान्यताप्राप्त विद्यापीठात आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही या अ‍ॅप्लिकेशनचा उपयोग करता येणार असून ते चार वर्षांसाठी ४१९९ रुपये वर्गणी भरून खरेदी करता येईल. कंपनीच्या ‘ऑफिस आणि क्लाऊड’ विभागाचे संचालक सुखविंदर आहुजा यांनी ही माहिती दिली. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, वननोट, आऊटलूक, पब्लिशर, अ‍ॅक्सेस ही ऑफिस अ‍ॅप्लिकेशन्स संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईलवरून वापरता येतील. काम करत असलेला डेटा क्लाऊड प्रणालीद्वारे साठवता येणार आहे. अ‍ॅप्लिकेशनबरोबर वीस गिगा बाईट्सचे स्कायड्राईव्ह स्टोरेज उपलब्ध असून स्कायड्राईव्हवर डिफॉल्ट पद्धतीने डेटा साठवण्याची सोय मिळणार आहे. हा संच विकत घेण्यासाठी विद्यार्थ्यांना http://www.office.com/verify   या संकेतस्थळावर जाऊन आपल्या अर्हतेची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. पडताळणी पूर्ण झाल्यावर ऑनलाईन मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर अ‍ॅप्लिकेशन खरेदी करता येईल.