भांडवली बाजारातील विद्यमान तेजीतून ‘सेन्सेक्स’ आपल्या सार्वकालिक उच्चांकापासून केवळ सहा-सात टक्के दूर आहे, तर त्याच वेळी बीएसई मिडकॅप निर्देशांकाला हे शिखर गाठण्यासाठी अवघ्या २ ते ३ टक्क्यांची वाढ पुरेशी ठरेल. वस्तुत: मागील एका वर्षांत उभय निर्देशांकांतील परताव्यातील अंतर लक्षणीय कमी झाले आहे हे पाहता, या पुढील बाजाराचा प्रवास मिड-कॅप समभागांच्या सरशी बांध घालणारा असेल, असा बहुतांश विश्लेषकांचा कयास आहे.

भारतीय शेअर बाजारात लार्ज कॅप व मिड कॅप यांच्या तुलनेत लार्ज कॅपचे मूल्यांकन गुंतवणूकयोग्य पातळीवर आहे. मिड कॅप व लार्ज कॅप मूल्यांकनातील फरक हा लार्ज कॅपच्या बाजूला कललेला आहे. यामुळे मागील सहा महिन्यांत अनेक फंडांनी आपल्या गुंतवणुकीत लार्ज कॅप समभागांचा समावेश केला आहे. मागील एका वर्षांत (१५ फेब्रुवारी २०१६ ते १४ फेब्रुवारी २०१७) सेन्सेक्सने २०.३ टक्के परतावा दिलेला आहे. याच दरम्यान एस अ‍ॅण्ड पी बीएसई निर्देशांकाने ३२.५७ टक्के परतावा दिलेला आहे. १५ फेब्रुवारी रोजी बाजार बंद होताना सेन्सेक्सचा पी/ई २१.७९ तर एस अ‍ॅण्ड पी बीएसई निर्देशांकाचा पी/ई ३७.६९ होता. या मूल्यांकनावरून मिड कॅप नक्कीच स्वस्त नाहीत हा निष्कर्ष काढता येतो. लार्ज कॅप विरुद्ध मिड कॅप मूल्यांकनातील इतक्या विस्तृत फरकाला अनेक कारणे आहेत. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या दृष्टीने मिड कॅप फंडानी अव्वल परतावा दिल्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना मिड कॅप फंडाचे आकर्षण वाटणे नैसर्गिक आहे.

मिड कॅप आणि स्मॉल कॅपचे मूल्यांकनाला मर्यादा असल्याने अलीकडे डीएसपी ब्लॅकरॉक मायक्रो-कॅप फंडाने नवीन गुंतवणूक स्वीकारणे बंद केले आहे. असाच काहीसा कल अन्य मिड कॅप व स्मॉल कॅप फंडांनीही अनुसरलेला लवकरच दिसेल.

लार्ज कॅपच्या बाजूने कौल का?

मिड-कॅप श्रेणीतील समभाग हे देशांतर्गत व्यवसाय असणाऱ्या कंपन्यांचे, तर लार्ज कॅप समभाग असणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय विस्तार देशा-विदेशांत आणि उत्पन्नांत निर्यात महसुलाचा मोठा वाटा असणाऱ्या आहेत. गेल्या काही वर्षांत नरमलेल्या जागतिक वृद्धीच्या पाश्र्वभूमीवर गुंतवणूकदारांकडून तुलनेने मिड-कॅप समभागांना प्राधान्य दिले गेले. परंतु जागतिक अर्थस्थितीत सुधारणेसह गुंतवणुकीचा कल पुन्हा लार्ज कॅपच्या बाजूने झुकू लागल्याचे दिसेल.