ऑगस्टमध्ये ९.५६ टक्क्याच्या वाढीसह रोकडरहित व्यवहारांना पसंती

मुंबई : नव्या युगाच्या रोकडरहित, कार्डरहित आणि संपर्करहित देयक व्यवहाराचा आधुनिक पर्याय अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (यूपीआय) माध्यमातून ऑगस्ट महिन्यात ३.५५ अब्जांहून अधिक व्यवहार पार पडले आहेत. जुलैच्या तुलनेत अशा व्यवहारांमध्ये झालेली ही ९.५६ टक्क्यांची वाढ आहे.

करोना काळात डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आणि तो क्रम निरंतर कायम आहे. विविध बँक खात्यांद्वारे मोबाइल फोनसारख्या एकाच माध्यमातून देयक व्यवहार पूर्ण करता येऊ शकणारी ‘यूपीआय’ ही अत्यंत सोपी, सुरक्षित व तात्काळ सुविधा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) द्वारे संचालित केली जाते. ‘यूपीआय’ मंचावर ऑगस्टमध्ये एकूण ६.३६ लाख कोटी रुपये मूल्याचे व्यवहार झाले, जे गेल्या महिन्याच्या तुलनेत ५.४१ टक्क्यांनी वाढले आहेत.

जानेवारी २०२१ पासून यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये सतत वाढ होत असून त्यात ५४ टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये २.३० अब्ज व्यवहार पार पडले होते. शिवाय मासिक व्यवहार मूल्यांमध्ये ४८ टक्के वाढ झाली आहे.

भारतामध्ये २०१६ मध्ये यूपीआय व्यवहारांना सुरुवात झाली. करोनाच्या काळात ऑनलाइन आर्थिक व्यवहारांना प्राधान्य देण्यात आल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. डिसेंबर २०१८ मध्ये, मासिक व्यवहारांनी एक कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आणि एक वर्षानंतर दोन लाख कोटी रुपये व्यवहार मूल्याचा टप्पा ओलांडला. ११ महिन्यांच्या काळात म्हणजेच सप्टेंबर २०२० मध्ये यूपीआय व्यवहार मूल्य ३.२९ लाख कोटी रुपयांवरून वाढून जुलै २०२१ मध्ये सहा लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

‘फोन पे’चे मोठे योगदान

फोनपे, गूगल पे आणि पेटीएम या डिजिटल मंचाच्या बँक खात्यांशी संलग्नतेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर यूपीआय व्यवहार पार पडतात. फोनपेच्या माध्यमातून जुलैमध्ये ४६ टक्के तर गूगल पेच्या माध्यमातून ३४.४५ टक्के व्यवहार पार पडले.