आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने घसरत असलेल्या खनिज तेलाच्या किमतींनी शुक्रवारी प्रति पिंप ३० डॉलरच्याही खालचा स्तर नोंदविला. तेल दर आता गेल्या एक तपाच्या तळात पोहोचले आहेत.

अमेरिकेने इंधन पुरवठा वाढविण्याचे धोरण कायम ठेवले असतानाच इराणने तेल बाजारपेठेत पुन्हा पाऊल ठेवण्याच्या निर्णयाचा इंधन दरांवर विपरीत परिणाम झाला. यातून आधीच अतिरिक्त असलेला पुरवठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तेल दर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरत आहेत. त्याचा प्रति पिंप ४० ते ३० डॉलर प्रवास अल्पावधीत झाला आहे. संथ जागतिक अर्थव्यवस्थेचे चित्र सर्वदूर असताना इंधनालाही मागणी न राहिल्याने तेल दराने अनोखा तळ या दरम्यान अनुभवला आहे. गेल्या पंधरवडय़ात खनिज तेलाचे दर १५ टक्क्यांनी घसरले आहेत.

अमेरिकेच्या बाजारातील तेलाचे प्रति पिंप ३०.५९ डॉलरने व्यवहार होत आहेत. तर प्रमुख लंडनच्या बाजारातील ब्रेंट दर्जाचे खनिज तेल दरानेही प्रति पिंप ३० डॉलरनजीक आले आहेत.

यापूर्वी २००४ मध्ये तेल दर चालू समकक्ष स्तरावर होते. तेल दर आणखी खोलात जातील, अशी भीती सीएमसी मार्केट्सचे मुख्य मिशेल मॅकक्रॅथी यांनी व्यक्त केली आहे.