पुन्हा इंधन उसळी; कपातीत रशियाची साथ

आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा खनिज तेल दराने मोठी उसळी घेतली. प्रति पिंप काळ्या सोन्याचा भाव सप्ताहारंभीच ६० डॉलपर्यंत पोहोचू पाहत आहे.

१० प्रमुख बिगर तेल उत्पादक देश व रशिया यांनी त्यांचे खनिज तेल उत्पादन प्रति दिन ५ लाख पिंपवर आणण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. त्याचा परिणाम खनिज तेल दरांवर उमटला.  अरब अमिरातसह प्रमुख तेल उत्पादक देशांनी यापूर्वीच इंधन उत्पादनात कपात करण्यास सहमती दर्शविली आहे. या प्रक्रियेत रशियाही आता सहभागी झाला आहे.

रशियासह अन्य प्रमुख बिगर तेल उत्पादक देशांनी त्यांचे उत्पादन नव्या वर्षांपासून कमालीने खाली आणण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. २००१ नंतर प्रथमच अशी भूमिका घेण्यात आली आहे. प्रमुख तेल उत्पादक देशांनी गेल्या महिन्यात याबाबत निर्णय घेतल्यानंतर अन्यही त्यामध्ये सहभागी झाले आहेत. २०१८ पर्यंत मर्यादित तेल उत्पादन घेण्यात येणार आहे. प्रमुख उत्पादक देश जानेवारी २०१७ पासून प्रति दिन १२ लाख पिंपाने त्यांचे उत्पादन कमी करणार आहेत.

भारतीय तेल व वायू समभागांना मूल्य फटका

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल दराने घेतलेल्या दरउसळीने आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी येथील भांडवली बाजारात या क्षेत्राशी संबंधित सूचिबद्ध कंपन्यांचे समभागांचे मूल्य रोडावले. बीपीसीएल, एचपीसीएस अशा सार्वजनिक क्षेत्रातील तेल व वायू विक्री तसेच विपणन कंपन्यांचे समभाग मूल्य एकाच व्यवहारात तब्बल ४ टक्क्य़ांपर्यंत आपटले.

एचपीसीएल

रु. ४३३.६०     -४.२५%

बीपीसीएल

रु. ६११.५५     -३.७३%

आयओसी

रु. २९५.९०     -२.२५%