भारतातील म्युच्युअल फंड व्यवसायात दुसऱ्या मोठय़ा विदेशी निधी व्यवस्थापन कंपनीनेही काढता पाय घेतला आहे. डॉइशे बँकेच्या भारतातील निधी व्यवस्थापन व्यवसायावर प्रॅमेरिका अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने ताबा मिळविला आहे. १००० कोटी रुपयांच्या घरात हा व्यवहार झाला असण्याची शक्यता आहे.
प्रॅमेरिकाने याबाबतचा करार डॉइशे बँकेबरोबर शुक्रवारी केला. मात्र व्यवहाराची रक्कम उघड करण्यात आली नाही. डॉइशेच्या व्यवहारामुळे प्रॅमेरिकाने येत्या कालावधीत या क्षेत्रातील अव्वल १० मध्ये स्थान मिळविण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. व्यवसायात दीवाण हाऊसिंगला भागीदार करून घेतल्यामुळे नवी कंपनी डीएचएफएल प्रॅमेरिका अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणून उदयास येण्याची चर्चा आहे.
डॉइशे बँक अखत्यारित डॉइशे अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना २००३ मध्ये झाली. आजच्या घडीला ही देशातील दुसरी मोठी विदेशी फंड कंपनी आहे. कंपनीने जून २०१५ अखेर २०,७२० कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन पाहिले आहे. तर प्रॅमेरिकाच्या सध्याच्या फंड व्यवसायात २४.४९ कोटी रुपयांद्वारे दीवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनलाही समान (५० टक्के) भागीदार करून घेण्यात येणार आहे. २,१२४ कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन पाहणाऱ्या प्रमेरिकाचे देशातील १९ शहरांमध्ये अस्तित्व आहे.
डॉइशे म्युच्युअल फंड कंपनी हे फ्रॅन्कलिन टेम्पलटननंतरचे देशातील दुसरे मोठे विदेशी फंड घराणे आहे. निधी व्यवस्थापनाबाबत भारतातील फंड व्यवसायात तिचे स्थान १५ वे आहे. डॉइशेबरोबरच्या व्यवहारामुळे प्रॅमेरिकाचे स्थान दोनने वाढून १३ व्या क्रमांकावर गेले आहे. प्रॅमेरिका ही कंपनी अमेरिकेतील प्रुडेन्शिअल फायनान्शियलची उपकंपनी म्हणून भारतात २००७ पासून कार्यरत आहे. प्रुडेन्शियल नावाचा – मूळचा अमेरिकेचा आणखी एक समूह याच क्षेत्रातच कार्यरत आहे. आयसीआयसीआय बँकेबरोबर त्याची भारतातील फंड व्यवसायात सध्या भागीदारी आहे.

डॉइशे बँकेचा निधी व्यवस्थापन व्यवसाय प्रॅमेरिकाकडे

माघारीचा ताजा इतिहास
भारताच्या म्युच्युअल फंड व्यवसायातून, मॉर्गन स्टॅन्ले (एचडीएफसी म्युच्युअल फंडाला हिस्सा विक्री), पाईनब्रिज (कोटक महिंद्र म्युच्युअल फंडात विलीन), आयएनजी वैश्य (बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडात विलिन), फिडेलिटी (एल अ‍ॅण्ड टी म्युच्युअल फंडाकडे) यांनी अलीकडच्या काळात माघार घेतली आहे. सेबीद्वारे गेल्याच आठवडय़ात व्यवसाय परवाना रद्द झालेल्या सहारा म्युच्युअल फंडावर स्वामित्वाची चर्चा सुरू झाली असताना आता आघाडीची खासगी येस बँकही निधी व्यवस्थापन क्षेत्रात येऊ पाहत आहे.