उद्दिष्टापेक्षा अधिक १७.१० लाख कोटींचे कर संकलन

केंद्र सरकारने आर्थिक २०१६-१७ सालात करांच्या माध्यमातून एकूण १७.१० लाख कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. १ फेब्रुवारी २०१७ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर महसुलापोटी १६.९७ लाख कोटींचे सुधारित उद्दिष्ट होते, ते  शंभर टक्के गाठण्यात सरकारला यश आले आहे.

revenue-chart

गेल्या वर्षी सरकारने करापोटी महसुलाच्या तुलनेत यंदा १८ टक्क्य़ांची दमदार वाढ सरकारला साधता आली आहे, असे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. गत सहा वर्षांतील कर महसुलातील ही सर्वोत्तम वाढ आहे, असे महसूल सचिव हसमुख अधिया म्हणाले.

एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या दरम्यान प्रत्यक्ष कर हे मागील वर्षांच्या तुलनेत १४.२ टक्क्यांनी वाढून ८.४७ लाख कोटी रुपये तर अप्रत्यक्ष करापोटी महसूल भरीव २२ टक्क्यांनी वाढून ८.६३ लाख कोटी रुपयांवर गेला आहे. दोन्ही प्रकारच्या करांमधील संकलन निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुक्रमे १०० टक्के आणि १०१.३६ टक्क्यांनी साध्य करण्यात आले, असे अधिया यांनी स्पष्ट केले.

प्रत्यक्ष करांमध्ये कंपनी करापोटी महसुली संकलन हे आधीच्या वर्षांच्या तुलनेत १३.१ टक्क्यांनी तर व्यक्तिगत प्राप्तिकरांच्या संकलनाचे प्रमाण १८.४ टक्क्यांनी वधारले आहे. तथापि कर परतावा (रिफंड) गृहीत धरल्यास ३१ मार्च २०१७ अखेर गोळा झालेल्या कंपनी कराचे प्रमाण ६.७ टक्क्यांनी तर व्यक्तिगत प्राप्तिकराचे प्रमाण २१ टक्क्यांनी उंचााले आहे. वस्तुत: २०१६-१७ मधील रिफंडचे १.६२ लाख कोटी रुपये हे प्रमाण आधीच्या वर्षांच्या तुलनेत ३२.६ टक्क्यांनी अधिक आहे.

अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत केंद्रीय अबकारी शुल्कापोटी २०१६-१७ सालात ३.८३ लाख कोटी रुपये गोळा झाले, जे आधीच्या वर्षांच्या तुलनेत ३३.९ टक्क्यांनी वधारले आहे. सेवा करांपोटी महसुलातही २०.२ टक्के वाढ होऊन तो २.५४ लाख कोटींवर, तर सीमाशुल्क महसुलात मागील वर्षांच्या तुलनेत ७.४ टक्के वाढ होऊन त्यातून २.२६ लाख कोटी रुपये गोळा झाले आहेत.