मोदी सरकार पुन्हा बहुमताने सत्तेवर येणार अशा मतमोजणीच्या कलाने हर्षोल्हसित दलाल स्ट्रीटवर गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सेन्सेक्सने पहिल्यांदाच ४० हजारांपुढे मुसंडी मारली. मात्र अपेक्षित कौलानंतर, बाजारातील उत्साहाची लाट ओसरत गेली आणि नफावसुलीमुळे प्रत्यक्षात २९९ अंशांच्या घसरणीसह सेन्सेक्सने दिवसाची अखेर केली. परिणामी, निफ्टी निर्देशांकही १२ हजारांच्या सार्वकालिक उच्चांकी शिखरावरून ४२७ अंश घरंगळला.

मोदी सरकार २०१४ साली सत्तेवर आले त्यावेळी मतमोजणीच्या दिवशी सेन्सेक्सचे पहिल्यांदाच २५,०००चे शिखर दिसले होते, यावेळच्या निकालाच्या दिवशी निर्देशांकाने ४०,००० ची अभूतपूर्व पातळी गाठली. तथापि, भाजपप्रणीत सरकार सत्तेवर येणार हे भांडवली बाजाराने गृहीतच धरले होते आणि याचे प्रत्यंतर मतदानोत्तर चाचणीचे आकडे आल्यावर दशकातील सर्वोत्तम १,४२१ अंशाच्या उसळीतून सोमवारी दिसून आले.