मोहनदास पै यांची टीका

कोणतेही धोरण न आखता आणि दोषींना विनाविलंब तुरुंगात टाकले जाईल यासाठी आवश्यक कायदेशीर व गोपनीय माहिती मिळवून देणारे बळ न जुटविता, केंद्र सरकारकडून काळा पैसा खणून काढण्याच्या सुरू असलेल्या गप्पा म्हणजे हास्यास्पद प्रकारच आहे, असे प्रतिपादन इन्फोसिसचे माजी संचालक आणि सरकारच्या विविध कर आणि अर्थविषयक समित्यांवर प्रतिनिधित्व करणारे टी. व्ही. मोहनदास पै यांनी केले. मोदी सरकारचे हे एक सर्वात मोठे अपयश असल्याचा प्रहारही त्यांनी केला.
काळ्या पैशाला प्रतिबंध करणारा नवीन कायद्याची रचना अत्यंत वाईट पद्धतीने केली गेली असून, त्याची अंमलबजावणी अव्यवहार्यच ठरेल. या देशात आपले अस्तित्व राखण्यासाठी कुणी संपत्तीतील ६० टक्के कर आणि दंड स्वरूपात चुकता करेल, असे माननेच अविश्वसनीय आहे. सुयोग्य धोरण आणि उत्तम माहिती संकलनाची सुप्त यंत्रणा असल्याशिवाय काळ्या पैशांसंबंधी कोणतीही कारवाई सफल होणार नाही, असे पै. यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. काळा पैसा विदेशांतील बँकांमध्ये भारत सरकारच्या कारवाईची वाट पाहून पडून आहे, असला भाबडा विचार सरकारच्या कृतीतून दिसून येतो. ही एक अत्यंत गूढ व सुविज्ञ संरचना आहे आणि तिच्या मागे कोणाकोणाचे हात आहेत याचा छडा लावणारी त्या तोडीचीच यंत्रणाही हवी, असे त्यांनी सूचित केले.