गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडताच निर्देशांकात २ हजार ५०० अंकांची घसरण झाल्याचं पहायला मिळालं. शुक्रवारी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ झाली होती. परंतु आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी पुन्हा एकदा शेअर बाजाराचा निर्देशांक कोसळला.

सोमवारी सकाळच्या सत्रात शेअर बाजार २ हजार ५४८ अंकांनी घसरून २७ हजार ३६७ अंकांवर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही ७५७ अंकांची घसरण होऊन तो ७ हजार ९८८ अंकांवर उघडला. करोना आजारानं जगभरातील देशांसमोर नवं संकट उभं केलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरही करोनाचा परिणाम दिसून येत आहे. भांडवली बाजारातील मोठी निर्देशांक पडझड कायम आहे.

करोनाविषयक दर मिनिटागणिक परिस्थिती आणि आकडेवारी बदलत असताना त्याचे सर्वच बाजारांवर भयानक परिणाम दिसत असून अन्नधान्य आणि सोने सोडता सर्वच प्रमुख कमॉडिटीजच्या किमती अनेक वर्षांच्या नीचांकावर आल्या आहेत. शेअर बाजार गडगडल्यामुळे गुंतवणूकदार, कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी यांची अवस्था बिकट झाली असून, हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतूक ८० ते ९५ टक्के बंद आणि दुकानेही बंद झाल्यामुळे पूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे.