कृषी रसायन तसेच औषधनिर्मितीतील आघाडीची मूळची जर्मन कंपनी बायरने जागतिक बियाणे उत्पादक मोन्सॅन्टो चा खरेदी व्यवहार अखेर बुधवारी पूर्ण केला. गेल्या चार महिन्यांपासून चर्चेत असलेला ही खरेदी रोखीने ६६ अब्ज डॉलरद्वारे पूर्ण झाली.

बायर तसेच मोन्सॅन्टो चे भारतात अस्तित्व आहे. तसेच येथील मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात या दोन्ही कंपन्या सूचिबद्ध आहेत. बायरचा भारतातील रसायन उत्पादन व्यवसाय लॅन्सेक्सने काही वर्षांपूर्वी ताब्यात घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर बायरने विस्तार धोरण अवलंबिले. बायर कृषी क्षेत्रातील रसायन उत्पादनेनिर्मितीत आघाडीवर आहे. या क्षेत्रातील अस्तित्व विस्तारताना बायरने मोन्सॅन्टो ची खरेदी पूर्ण केली आहे.

मोन्सॅन्टोची स्पर्धक सिंजेन्टाने नुकतीच केमचायना ही कंपनी ताब्यात घेतली होती. बायर आणि मोन्सॅन्टो दरम्यान याबाबतचा करार बुधवारी झाला. बायरने मोन्सॅन्टोची प्रति समभाग १२८ डॉलरप्रमाणे खरेदी केली आहे. दोन्ही कंपन्यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मोन्सॅन्टोचा भारतात तीन उपकंपन्यांद्वारे कृषी क्षेत्रातील व्यवसायात शिरकाव आहे. यामध्ये कंपनीचे १,००० हून अधिक कर्मचारी आहेत.

मोन्सॅन्टोच्या खरेदीचा पहिला प्रस्ताव बायरने ९ मे रोजी सादर केला होता. या वेळी बंद झालेल्या मोन्सॅन्टोच्या समभाग मूल्याच्या तुलनेत व्यवहार झालेल्या समभाग मूल्य हे ४४ टक्के अधिक आहे. बायरला आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच, क्रेडिट सूस, गोल्डमॅन सॅश, एचएसबीसी आणि जेपी मॉर्गन यांनी सहकार्य केले आहे.

गत चार महिन्यांत बायरने मोन्सॅन्टोच्या ताब्याचे दोन प्रयत्न केले. पहिल्यांदा १२२ डॉलर प्रति समभाग तर दुसऱ्या वेळी १२५ डॉलर प्रति समभाग असा प्रस्ताव दिला. अखेर प्रति समभाग १२८ डॉलर अशा चढय़ा दराने या व्यवहारावर शिक्कामोर्तब झाले. ही प्रक्रिया २०१७ पर्यंत पूर्णत्वास जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.