मुंबई : मूडीज इन्व्हेस्टर्स सव्‍‌र्हिसने वर्ष २०२१ मधील भारताच्या वृद्धीदराचा अंदाज खाली आणताना ९.६ टक्के व्यक्त केला आहे. या आधी मूडीजने भारताच्या वृद्धीदराचा अंदाज १३.९ टक्के वर्तविला होता.

‘मॅक्रोइकॉनॉमिक्स इंडिया : इकोनोमिक शॉक्स फ्रोम सेकंड कोव्हिड वेव्ह’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या अहवालात, एप्रिल आणि मेमध्ये कोविड-१९ दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्याचा परिणाम भारताच्या वृद्धीदरावर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राज्यांनी आता निर्बंध शिथिल केल्याने मेमधील अर्थव्यवस्था सामान्य होण्याची शक्यता असून भविष्यातील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्याचा सल्ला अहवालात देण्यात आला आहे. लसीकरणाबाबतचा वेग अर्थव्यवस्थेसाठी सर्वतोपरी पूरक ठरेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

करोना विषाणू संक्रमणामुळे २०२१ च्या भारताच्या वाढीच्या अंदाजाच्या अनिश्चिततेत वाढ झाली आहे. तथापि, आर्थिक नुकसान एप्रिल ते जून तिमाहीपुरते मर्यादित राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वर्ष २०२१ मधील भारताचा वृद्धीदर ९.६ ते ७ टक्के दरम्यान असेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.